नगर: महायुतीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे मताधिक्य राहिले नसल्याने नगर शहर विधानसभेची जागा विद्यामान उमेदवारालाच पुन्हा मिळाली तर ही जागा धोक्यात येईल, असा इशारा देत नगरची जागा भाजपलाच मिळावी, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे पक्षाच्या नगरमधील शिष्टमंडळाने दिल्ली भेटीत केली.
भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांच्यासह दिल्लीत गेलेल्या शिष्टमंडळाने विनोद तावडे यांची भेट घेतली, त्यावेळी ही मागणी करण्यात आली. यासंदर्भात बोलताना लोढा यांनी सांगितले की, नगर शहर भाजप-शिवसेना युतीचा बालेकिल्ला होता. परंतु, युतीमध्ये फुट झाली तरी भाजप व शहर विकासाच्या बाजूने असणारी मते भाजपकडेच आहेत. त्यामुळे सध्याच्या महायुतीमध्ये भाजपचा उमेदवार प्रभावी ठरू शकतो.
युतीचे आमदार म्हणून अनिल राठोड पाचवेळा निवडून गेले. नंतर शिवसेना-भाजप समोरासमोर लढली. मतांची फाटाफूट झाली, त्यात राठोड यांचा पराभव झाला. त्यावेळी विरोधात काँग्रेस होती. नंतर भाजप-शिवसेना एकत्र असतानाही राष्ट्रवादीला विजय मिळाला. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे फारसे मताधिक्य राहिलेले नाही, हे लोकसभा निवडणुकीने सिद्ध केले. सन २०१९ व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नगर शहरातून सुजय विखे यांना मताधिक्य मिळाले. याचाच फायदा घेऊन विधानसभा मतदारसंघात कमळ चिन्ह चालले.
आता कमळ चिन्ह विधानसभा निवडणुकीत मतदारांना दिले तर भाजपचा उमेदवार निश्चित निवडून येईल. उड्डाणपूल व बाह्यवळण रस्त्यामुळे नगर विकासाच्या प्रगतीपथावर आहे, असे मतदारांना जाणवले, त्यामुळेच मतांचे दान सुजय विखे यांच्या बाजूने टाकले तेच विधानसभेत परावर्तित्वाची असेल तर महायुतीचा उमेदवार जिंकण्यासाठी कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी.