अहमदनगर जिल्ह्यातून राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी आली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे सभापती तथा राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांच्याविरोधात न्यायालयाने पकड वॉरंट काढले आहे.संगमनेर तालुक्यातील चार डाळिंब उत्पादक शेतकरी यांची नाहटा यांनी सुमारे ६० लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी संगमनेर न्यायालयात कलम १३८ प्रमाणे गुन्हा दाखल होऊन तारखेस हजर न झाल्याने हे वॉरंट काढले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
दीपक काशिनाथ जाधव, मधुकर किसन ससाणे, सुरेश संपतराव सावरे, भाऊसो रामचंद्र वाघचौरे (रा. संगमनेर) असे फसवणूक झालेल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्याची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नाहटा यांनी
संगमनेर येथील दीपक काशिनाथ जाधव, मधुकर किसन ससाणे, सुरेश संपतराव सावरे, भाऊसो रामचंद्र वाघचौरे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील सुमारे ६० लाख रुपये किमतीचे डाळिंब खरेदी केले. या खरेदीपोटी नाहटा यांनी या चार शेतकऱ्यांपैकी दीपक काशिनाथ जाधव (रा. संगमनेर) यांच्या नावे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा लोणी व्यंकनाथ यांच्या खात्यावरील ६० लाख रुपयांचा दि. ५ एप्रिल २०२३ रोजीचा धनादेश दिला.
हा धनादेश वटविण्यासाठी दिपक जाधव यांनी बँकेत भरला असता धनादेश बाऊन्स झाला. त्यामुळे या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी नाहटा यांच्याविरोधात संगमनेर जिल्हा अहमदनगर येथील न्यायालयात कलम १३८ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी नाहटा हे न्यायालयात गैरहजर राहिल्याने
मा. न्यायालयाने नाहटा यांच्या विरोधात दि. ९ मे २०२४ रोजी पकड वॉरंट जारी करत नाहटा यांना न्यायालयात हजर करण्यासाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्याला कळविले आहे. या पकड वॉरंटमुळे तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.