नगर : शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा मारहाण करून खून केल्याच्या आरोपावरून प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी वृद्धाला जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. विशेष म्हणजे या खटल्याच्या सुनावणीत ज्याचा खून झाला त्याची पत्नी, फिर्यादी व पुतण्या असे दोन साक्षीदार फितूर झाल्याचे जाहीर करण्यात आले होते.
दिनकर अण्णाजी गव्हाणे (६५, अल्हणवाडी, पाथर्डी, नगर) या वृद्धाला जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. या खटल्यात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील अनिल घोडके यांनी काम पाहिले. एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले.
दिनकर गव्हाणे व त्याचा भाऊ मधुकर गव्हाणे या दोघांमध्ये शेतीच्या कारणावरून भांडण झाले होते. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी शहाबाई मधुकर गव्हाणे व तिचा पती मधुकर हे शेतात जाताना आरोपी दिनकर व त्याचा पुतण्या संतोष माणिक गव्हाणे यांनी मागील भांडणाच्या कारणावरून खोरे व दगडाने मधुकर गव्हाणे यांना मारहाण करून जखमी केले. मधुकर गव्हाणे यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना १४ नोव्हेंबरला मृत्यू झाला.
या गुन्ह्याचा तपास पाथर्डीचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक टी. बी. पाटील यांनी करून दोन आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. दुसऱ्या आरोपीची खटल्यातून मुक्तता करण्यात आली.
खटल्याच्या कामकाजात सरकारी वकिलांना पैरवी अधिकारी महेश जोशी व अरविंद भिंगारदिवे यांनी सहाय्य केले.