राहुरी तालुक्याच्या पूर्वभागात रात्रीच्यावेळी आकाशात ड्रोन घिरट्या मारत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण होऊन भीतीचे वातावरण पसरले आहे. राहुरी तालुक्यातील आरडगाव, मानोरी, टाकळीमिया परिसरात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन घिरट्या मारत आहे. हे ड्रोन चोरी करण्याच्या दृष्टीने रेकी करण्यासाठी उडवले जात असल्याची चर्चा सुरू होती.
मात्र, रात्रीच्या वेळी आकाशात घिरट्या घालणार्या ‘ड्रोन’ चा उलगडा झाला नसून याबाबत लष्करासाठी ड्रोन बनविणार्या कंपनीकडून परिसरात याच्या चाचण्या सुरू असल्याचे चर्चा जोर धरू लागली आहे. याबाबत खरे कारण समजू शकले नसल्याने याविषयीचे अनेक तर्क वितर्क काढले जात आहे. तरी प्रशासनाने याबाबत सविस्तर माहिती देऊन ग्रामिण भागातील ग्रामस्थांची भिती घालवावी अशी मागणी होत आहे.
सोनई व परिसरात दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळी ड्रोन फिरत असल्याने नागरिकांत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी असाच प्रकार सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. ड्रोन कोण उडवतं? कशासाठी उडवत असून त्या मागचा हेतू काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. चोरीच्यादृष्टीने तर हे ड्रोन फिरत नाही ना? अशी शंका ग्रामस्थांना आहे. ड्रोन परिसरात दिसला की एकमेकांना फोन करून त्याची माहिती एकमेकांना ग्रामस्थ सांगत असून या ड्रोनचा पाठलाग करत आहे. चोरीच्या उद्देशाने चोर टेहळणी तर करत नाही ना? असा संशय नागरिकांना आहे मात्र चोरीची कुठलीही घटना परिसरात घडलेली नाही.
सोनई, वंजारवाडी, लांडेवाडी, गणेशवाडी, हनुमानवाडीसह परिसरात दोन दिवसापासून रात्रीच्या वेळी ड्रोन कॅमेरे फिरत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे ग्रामस्थ त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सोशल मीडियात टाकत आहे. याविषयी सोनई पोलीस ठाण्यात चौकशी केली असता आर्मीचा सर्व्हे चालू असल्याची माहिती मिळाली आहे. हे ड्रोन रात्रीच्या अंधारात उडवून नेमका कुठला डेटा कलेक्ट केला जातो हा प्रश्न आहे.