नगर : ओरिसा राज्यातून पुणे जिल्ह्यातील खेड-मंचरकडे जाणारा सुमारे १५० किलो गांजा मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने रविवारी दुपारी करंजी घाटाजवळील दगडवाडी शिवारात (ता. पाथर्डी) पकडला. यासंदर्भात चौघांना त्यांच्याकडील दोन वाहनांसह ताब्यात घेण्यात आले आहे.
कल्याण-निर्मला राष्ट्रीय महामार्गावरून अमली पदार्थांची वाहतूक होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सकाळपासूनच सापळा रचला होता. पाळत ठेवलेली दोन वाहने दगडवाडी फाट्याजवळ थांबली. त्यातील चौघेजण एका उपहारगृहात जाताच पथकाने या वाहनांची झडती घेतली. त्यामध्ये सहा गोण्यातून सुमारे दीडशे किलो गांजा आढळला. पथकाने लगेच हॉटेलमधील चौघांना ताब्यात घेतले. या कारवाईची माहिती पाथर्डी पोलिसांना मिळाली. पाथर्डी पोलिसांचे पथक दगडवाडी फाट्याजवळ पोहोचलेही, मात्र आमची कारवाई पूर्ण झाल्यानंतर माहिती दिली जाईल, असे मुंबई पोलिसांकडून सांगितले गेले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांनीही घटनास्थळी भेट दिली.