Saturday, October 12, 2024

हलगी, तुतारी व भांड्यांच्या निनादात महिला बांधकाम कामगारांचा आक्रोश

नगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या चुकीच्या धोरणाच्या निषेधार्थ व योजनांचा लाभ मिळत नसल्याने कष्टकरी महिला बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर सोमवारी (दि.23 सप्टेंबर) रिकामे भांडे वाजवून आक्रोश आंदोलन केले. लोकशाही बांधकाम कामगार व इतर कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात कडाडलेल्या हलगीच्या निनादात महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर तुतारी वाजवून बांधकाम कामगारांच्या प्रश्‍नावर शासनाचे लक्ष वेधण्यात आले.
मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या महिला बांधकाम कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या दिल्याने संपूर्ण रस्ता आंदोलक महिलांनी व्यापला होता. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महतिकुमार दोशी, निसार शेख, वैभव सोनवणे, आदेश साळवे, संगीता बोखारे, लक्ष्मी लवटे, दिपाली सरोदे, आसमा शेख, आशा माने, राणी घोडके, मंगल पाखरे, कांतीलाल भिसे, राहुल अडसूळ, रियाजभाई तांबोळी, समीना सय्यद, सुनील जाधव, सुनिता सरोदे, स्वप्निल जाधव, विशाल खराडे, शाहिन शेख, पुनम समुद्र, राहुल अडसूळ, शोभा येडे, मालन पवार, अश्‍विनी वांकडे, साधना साळवे, राणी जाधव आदींसह विविध समाजातील महिला कामगार सहभागी झाले होते.
लाडकी बहीण योजनेतून महिलांचा बऱ्याच फायदा होणार आहे. परंतु ज्या बांधकाम व इतर कष्टकरी कामगार वर्गातील महिलांना या महागाईच्या काळात दीड हजार रुपयांचा फायदा होणार नाही. हजारो कोटी रुपये कामगार मंडळाकडे असून, तो पैसा नोंदणीत महिला कामगारांना मिळाल्यास त्यांना जीवन जगणे सुसह्य होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शंकर भैलुमे म्हणाले की, कष्टकरी महिलांवर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अन्याय करत आहे. कष्टकरी बहीण उपाशी असून, शासनाने त्यांच्याकडे लक्ष द्यावे. कोट्यावधी पैसे असून, देखील त्याचा लाभ कामगार वर्गाला दिला जात नाही. पूर्वी कामगारांना जेवण दिले जायचे, मात्र त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने ती योजना बंद करुन कामगारांना उपाशी ठेवण्यात आले आहे. कामगार वर्ग उपाशी असल्याने त्यांना रिकामे डबे, ताट वाजवण्याची वेळ आली आहे. शासनाच्या वतीने दिले जाणारे लाभ कामगारांपर्यंत पोहोचत नाही. कामगरांचा दिवाळी बोनसही बंद करण्यात आला असून, त्यांना महागाईच्या काळात जीवन जगणे अवघड बनले असल्याचे त्यांनी सांगितले. बांधकाम कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास हा मोर्चा मुंबई येथील कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयावर धडकणार आहे. तर महिला कामगार अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
महाराष्ट्र कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने महिला कामगारांना 5 हजार रुपये महिना कामगार कल्याणकारी मंडळाकडून मिळावा, नोंदीत कामगारांना दिवाळीसाठी 5 हजार रुपये बोनस म्हणून दिले जायचे. परंतु ते तीन ते चार वर्षापासून बंद करण्यात आले असून, यावर्षी 10 हजार रुपये बोनस देण्यात यावा. कामगार कल्याणकारी मंडळकडून तालुकास्तरावर उभारण्यात आलेल्या बीओसी सेंटरवर शासकीय अधिकारी नियुक्त करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्विकारले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles