सफाई कामगारांच्या वारसांना खा.निलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी मिळवून दिला न्याय
आयत्या बिळावर नागोबांची श्रेय घेण्यासाठी केविलवाणी धडपड : अभिषेक कळमकर
नगर: महानगरपालिकेतील सफाई कामगारांच्या वारसांना न्यायालयीन निर्णय व शासन आदेशानुसार नियुक्ती आदेश देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातील इतर अनेक महानगरपालिकांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी केली असताना अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाकडून चालढकल सुरू होती. या पार्श्वभूमीवर माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पाठपुरावा करून खा. निलेश लंके यांच्या माध्यमातून मनपा आयुक्त यशवंत डांगे, उपायुक्त मुंडे तसेच आस्थापना विभाग प्रमुखांशी चर्चा करून पात्र वारसांना नियुक्ती पत्र देण्याची मागणी केली तसेच नियुक्ती पत्रावर अधिकाऱ्यांच्या सह्या घेतल्या. तब्बल २७ जणांना त्यांच्या वारसा हक्काचा लाभ मिळाला आहे. वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेला प्रश्न खा. लंके – कळमकर यांनी अवघ्या आठ दिवसांत मार्गी लावला. परंतु आता झोपेतून जागे झालेले लोकं आयत्या बिळावर नागोबांची भूमिका घेत श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहेत. परंतु सत्य आणि प्रामाणिक प्रयत्न कोणी केले हे सगळ्यांनाच माहीत आहे, अशी भावना माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी व्यक्त केली आहे.
मनपाच्या आरोग्य विभागातील सफाई कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला नियुक्त्यांचा प्रश्न खा. निलेश लंके यांनी काही तासांतच मार्गी लावल्याने कर्मचारी आनंदीत झाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक दिलीप सातपुते, बाळासाहेब बोराटे, कर्मचारी कृती समितीचे गुलाब गाडे अशा पदाधिकाऱ्यांनी यासाठी योगदान दिले.
अभिषेक कळमकर म्हणाले, कोणत्याही शहराचे गावाचे आरोग्य चांगले ठेवण्यात सफाई कामगारांचा सिंहांचा वाटा असतो. अपुऱ्या सोयी सोयी सुविधा असूनही सफाई कामगार आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावतात. खरे तर समाजातील स्वच्छता दूत आहेत. लाड पागे समितीच्या शिफारशींचा लाभ सफाई कामगारांना दिला जात नव्हता. शासन निर्णय, न्यायालयाचा निकाल असतानाही वारसा हक्काने नियुक्ती दिली जात नव्हती. राज्यातील इतर महानगरपालिकांनी शासन आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. मात्र नगर महापालिकेने या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केली होती. या पार्श्वभूमीवर खा. निलेश लंके यांच्या माध्यमातून मनपा प्रशासनास नियुक्ती आदेश देण्याचे काम सुरू केले आहे. सफाई कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यात यश आले याचा आनंद आहे. दुर्दैवाने प्रत्येक गोष्टीत श्रेय घेण्याची सवय लागलेले तथाकथित लोकप्रतिनिधी आता पुढे आले आहेत. त्यांना कायम उशिरा जाग येते आणि ते श्रेय लाटण्याचा केविलवाणी धडपड करतात. आताही तसाच प्रकार सुरू झाला असला तरी खरं श्रेय कोणाचे हे त्या लाभार्थ्यांना माहिती आहे.