युवतीचा पाठलाग करून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणार्या तरुणाविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. साहील बलभीम सोनटक्के (रा. एकता कॉलनी, केडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. उपनगरात वास्तव असलेल्या पीडिताने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
19 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास युवती क्लासवरून घरी जात असताना साहीलने तिला रस्त्यात अडविले. ‘तु माझ्याशी बोलत का नाही, माझा फोन का उचलत नाही, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’ असे म्हणून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. ‘तु जर माझ्याशी बोलली नाही, तर मी तुझे फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करीन, तुला व तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही, सगळ्यांना मारून टाकीन’ अशी धमकी दिली व तेथून निघून गेला.
तसेच साहील याने वेळोवेळी युवती कॉलेजला जात असताना तिचा पाठलाग करून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला व त्रास दिला आहे. तिच्या भावाला फोन करून त्याच्यासह घरच्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार बी. व्ही. सोनवणे करत आहेत.