शिवसेना संपर्क प्रमुख आ.शिंदे व किरण काळे यांच्यात चर्चा…. संजय राऊतांना भेटणार

0
19

शिवसेना संपर्कप्रमुख आ. शिंदेंची शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष काळेंनी घेतली भेट ;

बंद दाराआड गुप्तगू, शिवसेना नेते संजय राऊतांच्या भेटीचे काळेंना निमंत्रण

प्रतिनिधी : शिवसेना संपर्कप्रमुख आ. सुनील शिंदे नगर शहरात आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह आ. शिंदे यांची भेट घेतली. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आ. शिंदे आणि काळे यांच्यात शासकीय बंद दारा आड गुप्तगू झाले. या चर्चेचा तपशील मात्र समजू शकला नाही. यावेळी शहर काँग्रेसच्या वतीने काळे यांच्या हस्ते आ. शिंदेंचा सत्कार करण्यात आला. तर आ. शिंदे यांनी किरण काळे यांना शिवसेना नेते संजय राऊत पुढील आठवड्यात नगर दौऱ्यावर येणार असून त्यावेळी त्यांच्या भेटी साठीचे निमंत्रण दिले. शहर काँग्रेसने ते स्वीकारले.

यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे शहर जिल्हा सरचिटणीस दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, सावेडी काँग्रेस विभागप्रमुख अभिनय गायकवाड, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, केडगाव काँग्रेसचे किशोर कोतकर, इंजि. सुजित क्षेत्र, युवा सेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे, शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, माजी नगरसेवक योगीराज गाडे, अमोल येवले, हर्षवर्धन कोतकर, स्मिताताई अष्टेकर आदींसह काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत आ. शिंदे म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडी आहे. नगर शहरात देखील आघाडीतील घटक पक्ष म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गट व काँग्रेस यांचे विचार एकच आहेत. मनपात राज्य शासनाच्या वतीने नियुक्त केलेला प्रशासक आहे. त्यावर व्यापक जनहित डोळ्यासमोर ठेवत अंकुश ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून सामूहिकरित्या रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली गेली पाहिजे. आगामी निवडणुकांसाठी सर्वांनी सज्ज असले पाहिजे. यावेळी किरण काळे यांनी शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिलभैय्या राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला. नगरकरांच्या मनातून कोणीही त्यांचे नाव पुसू शकत नाही असे काळे म्हणाले.

याबाबत माहिती देताना किरण काळे म्हणाले, ही सदिच्छा भेट होती. राज्यात महाविकास आघाडी आहे. त्यामुळे आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेणे हे नित्याचे आहे. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खा.सुप्रियाताई सुळे या शहर दौऱ्या वर आल्या होत्या. त्यावेळी देखील शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले होते. त्याच प्रमाणे त्यांनी माझ्या घरी देखील भेट दिली होती. आगामी काळात आघाडीच्या माध्यमातून राज्यातील नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नगर शहरामध्ये जनहिताची मजबूत लढाई निश्चितपणे उभी केली जाईल. सर्वांना बरोबर घेतले जाईल.