अहमदनगर श्रीरामपूर : शहरातील वॉर्ड नं. ७ मधील महाले पोतदार स्कूलच्या पुढे एका जनावराच्या गोठ्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्याचे दिसून आले. यावरून शहराच्या हद्दीतही बिबट्याचा वावर असल्याचे समोर आले आहे. महाले पोतदार स्कूलच्या ओट्याजवळ वीरेंद्र यादव यांचा गायी म्हशींचा गोठा आहे. बुधवार, २० मार्च रोजी बिबट्या या परिसरात आला होता व त्याने कुत्र्यावर झडप मारली. यावेळी कुत्रा पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याच्यामागे बिबट्या पळत असल्याचे दिसून येते. बिबट्याच्या संचारामुळे जनावरे काही वेळ बिथरली होती. वनविभागाने या घटनेची दखल घेऊन परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
- Advertisement -