नगर : ज्यांना आपले पक्ष व आमदार सांभाळता आले नाहीत, असे बाद झालेले पक्ष इंडिया आघाडीत एकत्र आले आहेत. तेच लोक आता यात्रा काढत आहेत. आघाडीच्या बैठका म्हणजे केवळ पर्यटन आहे. त्यांनी आता पंतप्रधानांच्या सूचनेनुसार लक्षद्वीपला बैठक घ्यावी व पर्यटन करावे. देवधर्माचा अपमान होत असताना उद्धव ठाकरेंमध्ये जाब विचारण्याची हिंमत नाही, त्यामुळे लोकसभा निवडणूक नंतर ठाकरेंचे उरलेसुरलेही शिल्लक राहणार नाहीत, अशी टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी, रविवारी नगरमध्ये बोलताना केली.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट), शिवसेना व महायुतीतील १५ घटक पक्षांच्या पहिला मेळावा नगरमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे व खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री आमदार राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे आदींसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार लंके महायुतीच्या विरोधात भूमिका घेणार नाहीत
महायुतीच्या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) आमदार नीलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, भाजपचे माजी आमदार वैभव पिचड अनुपस्थित होते. यापैकी आमदार लंके यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे जाहीर करत शिवस्वराज्य यात्रा मतदारसंघात सुरू केली आहे. महायुतीच्या मेळाव्यास लंके अनुपस्थित असल्याकडे लक्ष वेधले असता, मंत्री विखे म्हणाले, त्यांना निरोप देण्याची जबाबदारी समन्वयकांवर होती. त्यांनी निरोप दिला होता. परंतु ते का आले नाहीत हे सांगता येणार नाही. परंतु ते महायुतीच्या विरोधात काही भूमिका घेतील, असे वाटत नाही.