कथित ट्रीपल इंजिन सरकारने मराठा आरक्षणासाठी तत्परता दाखवावी: अभिषेक कळमकर
नगर: आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. नगरमध्येही मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले आहे. माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
अभिषेक कळमकर म्हणाले की, मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारने अतिशय संवेदनशील होऊन हाताळणे गरजेचे आहे. मनोज जरांगे पाटील यांनी ४० दिवसांचा वेळ दिला होता. या काळात सरकारने ठोस पावले न उचलता वेळकाढूपणा केला. त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. राज्यभरात मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. वास्तविक पाहता मराठा समाजाला कायदेशीर कसोटीवर टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. तिथेच त्यांनी पंतप्रधानांना मराठा समाजाच्या आग्रही मागणीबाबत भावना कळवून केंद्राला योग्य पावले उचलण्यास आग्रह केला पाहिजे होता. परंतु पंतप्रधानांनी महाराष्ट्रात येऊनही मराठा आरक्षणाबाबत चकार शब्द काढला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजाचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे. आरक्षण मर्यादा ५० टक्केच्या पुढे वाढवणं पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातात आहे. त्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावून केंद्र सरकारने कायदा मंजूर करून घेतला पाहिजे. तसेही केंद्रात आणि राज्यात भाजप प्रणित सरकार आहे. डबल इंजिन सरकार म्हणून सत्ताधारी स्वतःची पाठ थोपटून घेतात. हीच डबल इंजिन सरकारची तत्परता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिसली पाहिजे. आज मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती उपोषणामुळे खालावली आहे. समाजासाठी सर्वोच्च त्याग ते करीत आहेत. त्यांच्या पाठीशी सकल मराठा समाज एकवटला आहे. समाजाचा मोठा उद्रेक होण्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी कळमकर यांनी केली.
सोमवार पासून तहसील कार्यालय येथे नगर शहरातील सकल मराठा समाज बांधव आमरण उपोषणला बसत आहेत. त्यांना नगर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पाठिंबा कळमकर यांनी दिला.