नगर : लोकसभा निवडणुकीसाठी परस्पर स्वत:ची उमेदवारी जाहीर करणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांना कोण थांबवणार, असा टोला महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी पारनेरचे आमदार नीलेश लंके व त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य राणी लंके यांची नावे न घेता लगावला. जिल्हा नियोजन समितीच्या आगामी सन २०२४-२५ या वर्षाच्या आर्थिक विकास आराखड्याच्या मान्यतेसाठी मंत्री विखे यांनी बैठक घेतली. त्या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत व राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही थेट टीका केली, तर आमदार लंके यांच्यावर सूचक भाष्य केले. काही दिवसांपूर्वी आमदार लंके यांची पत्नी राणी लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आपण किंवा आमदार लंके उमेदवारी करणार असल्याचे जाहीर करत दक्षिण नगर जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रा सुरू केली आहे. पाथर्डीतून यात्रेची सुरुवात करताना नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारच, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. आमदार लंके यांच्या भूमिकेकडे लक्ष वेधले असता, स्वयंघोषित उमेदवारांना कोण थांबवणार? मात्र, महायुतीचा धर्म पाळून पक्षश्रेष्ठींकडून घेतलेले निर्णय सर्वांना मान्य करावे लागतील, असेही मंत्री विखे यांनी स्पष्ट केले.
स्वतःची उमेदवारी घोषित करणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांना कोण थांबवणार? मंत्री विखेंचा लंकेंना टोला
- Advertisement -