नगर : नगर लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनाच भाजप उमेदवारी देणार असल्याचे संकेत मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा नवी खेळी करून त्यांना शह देण्याची तयारी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर मोठी पडझड झाली आहे. राष्ट्रवादी एकसंघ असतानाही अहमदनगर लोकसभेची जागा पवारांना जिंकता आली नव्हती. मागीलवेळी प्रतिष्ठेची बनलेली ही निवडणूक पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक विखे पाटील यांचे चिरंजीव खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी जिंकली. या वेळीही डॉ. विखे पाटीलच भाजपचे उमेदवार असल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे पवार यांनी त्यांना शह देण्याची परंपरा सुरू ठेवण्याची तयारी केल्याचे दिसते.
अजित पवार यांच्या बंडोखोरीनंतर यासंबंधीचा कायदेशीर लढा सुरूच असताना पवार यांनी पक्ष बांधणीसाठी पुन्हा तयारी सुरू केली आहे. जवळ आलेल्या लोकसभा निवडणुकीचीही तयारी सुरू आहे. एका बाजूला महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बोलणी, तर दुसरीकडे उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. वाटपात नगरची जागा पवार यांच्या गटाला जाणार असे मानले जाते. पक्ष एकसंघ असताना पारनेरचे आमदार नीलेश लंके यांना लोकसभेचे उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले होते. मात्र, आता लंके यांच्यासह नगरमधील सहापैकी चार आमदार अजितदादांसोबत गेले, तर दोघेच पवार यांच्याकडे राहिले आहेत. मागीलवेळी डॉ. विखे पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढलेले आमदार संग्राम जगताप हेही अजितदादांसोबत गेले आहेत. त्यामुळे पवार यांना लोकसभेसाठी नवा उमेदवार शेधावा लागणार आहे.
शिर्डीत तीन व चार जानेवारीला ‘ज्योत निष्ठेची : लोकशाहीच्या संरक्षणाची’ या दोन दिवसांच्या राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर निमंत्रित पदाधिकाऱ्यांसाठी आहे