नगर : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) उमेदवारांच्या मुलाखती सोमवारी (दि. ७) पुण्यात होत आहेत. दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे, माजी आमदार चंद्रशेखर घुले पक्षाच्या संपर्कात असल्याची, तसेच अकोल्यातून शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) मधुकर तळपाडे व श्रीगोंद्यातून विखे समर्थक अण्णासाहेब शेलार यांनी उमेदवारीसाठी अर्ज केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.
शेवगाव-पाथर्डीमधून प्रताप ढाकणे यांना उमेदवारी मिळणार असली, तरी तेथील माजी आमदार चंद्रशेखर घुले पक्षाच्या संपर्कात आहेत, असाही गौप्यस्फोट फाळके यांनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही. बेरोजगारी-महागाई, शिव-शाहू- फुलेंचा विचार, शेतकरीविरोधी कायदे, सन २०१४ पासून शेतमालाला हमीभाव नाही, कर्जमुक्ती नाही, नैसर्गिक आपत्तीची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही, होरपळलेला दूधउत्पादक, महाराष्ट्रातून गुजरातला जाणारे उद्याोग, स्पर्धा परीक्षेतील सावळा गोंधळ, राज्यातील कायदा व सुव्यवस्था आदी मुद्द्यांवर राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात पुस्तिका प्रकाशित केली जाणार असल्याची माहितीही राजेंद्र फाळके यांनी दिली.
पक्षाकडे अर्ज केलेले इच्छुक उमेदवार पुढीलप्रमाणे-अकोले अमित भांगरे व मधुकर तळपाडे, कोपरगाव दिलीप लासुरे व संदीप वर्पे, शिर्डीतून रणजीत बोठे व अॅड. नारायणराव कार्ले, शेवगाव-पाथर्डी प्रताप ढाकणे व विद्या गाडेकर, पारनेरमधून राणी लंके, रोहिदास कर्डिले व माधवराव लामखेडे, नगर शहर डॉ. अनिल आठरे, शौकत तांबोळी व अभिषेक कळमकर, श्रीगोंद्यातून बाबासाहेब भोस, राहुल जगताप, श्रीनिवास नाईक व अण्णासाहेब शेलार यांनी अर्ज केले आहेत.