ज्येष्ठ नेते खा. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने नगर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांतून गुरूवार 26 व शुक्रवार 27 सप्टेंबरला शक्तीप्रदर्शनाचे नियोजन केले आहे. शिवस्वराज्य यात्रांच्यानिमित्ताने जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांत समर्थकांशी संवाद साधत सभांचे नियोजन करण्यात आले आहे. यात उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले आणि दक्षिण नगर जिल्ह्यातील शेवगाव, श्रीगोंदा, नगर शहर, राहुरी व पारनेर या पाच मतदार संघांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील शिवस्वराज्य यात्रेच नियोजन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले आहे. गुरुवारी 26 रोजी सकाळी 10 वाजता अकोले तालुक्यातील कोतूळ येथे शिवस्वराज्य यात्रेची पहिली जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता शेवगाव येथील खंडोबा मैदानात (खंडोबानगर) येथे दुसरी जाहीर सभा होणार आहे आणि सायंकाळी श्रीगोंदा येथील संत मोहंमद महाराज मैदानात तिसरी सभा होणार आहे.
या यात्रेचा मुक्काम नगर शहरात होणार असून, दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि.27) सकाळी 10.30 वाजता टिळकरोड सभा होणार आहे. येथून ही यात्रा शिर्डीकडे रवाना होणार असून तेथे साई समाधी मंदिरात दर्शन घेतल्यावर दुपारी 4 वाजता राहुरी येथील नवी पेठेत जुन्या ग्रामीण रुग्णालयासमोर सभा होणार आहे. तेथून ही यात्रा पारनेरकडे रवाना होणार आहे. पारनेर तालुक्यातील निघोज येथे सायंकाळी सभा होणार आहे.