नगर – गामा उर्फ ओंकार भागानगरे खून प्रकरणातील आरोपी नंदू बोराटे यास जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नकार दिला आहे. जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज ठेवण्यात आला होता.
20 जून 2023 रोजी फिर्यादी ओंकार रमेश घोलप यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती की, 19 जून 2023 रोजी फिर्यादी हा गामा उर्फ ओंकार भागानगरे व इतर मित्रांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे जाऊन गणेश केराप्पा हुच्चे याचे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्याबाबत तक्रार केल्याने कोतवाली पोलिसांनी गणेश हुच्चे यांच्या अवैध धंद्यावर छापा टाकून कारवाई केली. त्यावेळेस आरोपी गणेश हुच्चे याने, तुमच्याकडे पाहून घेतो! असे म्हणून निघून गेला होता.
20 जून 2023 रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास आरोपी नंदू बोराटे गाडी चालवीत व त्याच्यामागे गणेश हुच्चे बसून बालिकाश्रम रोड येथे रुबाब कलेक्शनच्या जवळ येऊन सदर गुन्ह्यातील आरोपींनी ओंकार भागानगरे यावर तलवारीने सपासप वार करून खून केला होता. याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणामध्ये तोफखाना पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी गणेश केरप्पा हुच्चे, नंदू लक्ष्मण बोराटे, संदीप गुडा व इतर यांच्याविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते. सदरील दोषारोपपत्रामध्ये तपासी अधिकारी यांनी सीसीटीव्ही फुटेज चलचित्र पंचनामा जोडलेला होता. त्याचप्रमाणे आरोपींचे मोबाईल संभाषण देखील तपासामध्ये निष्पन्न झाले होते.
सदरील प्रकरणात आरोपी नंदू बोराटे याचा जामीन अर्ज सत्र न्यायालय अहमदनगर यांनी 1 ऑगस्ट 2024 रोजी फेटाळला होता. त्यामुळे आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जामीन अर्ज दाखल केला होता. सदरील प्रकरणामध्ये मूळ फिर्यादी घोलप यांच्यावतीने ॲड.एन.बी. नरवडे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास चलचित्र पंचनामा, साक्षीदारांचे जबाब, मोबाईल संभाषण व इतर सबळ पुरावे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर उच्च न्यायालयाने आरोपी पक्षाचे, मूळ फिर्यादीचे व सरकारी पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आरोपीचा जामीन अर्ज मंजूर करण्यास नकार दर्शविला आहे. आरोपीने सदरचा अर्ज पाठीमागे घेतला. सदर प्रकरणामध्ये फिर्यादीच्या वतीने ॲड.एन.बी. नरवडे यांनी काम पाहिले.
ओंकार भागानगरे खून प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावर न्यायालयाचा निकाल..
- Advertisement -