नगर जिल्ह्यात विधानसभेसाठी घमासान लढती रंगणार! बाराही मतदारसंघात इच्छुक सरसावले…’मविआ’ आणि ‘महायुती’ची कसोटी
नगर(सचिन कलमदाणे): नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच मतदारसंघात इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मागील २०१९ च्या निवडणुकीत नगर जिल्ह्यात भाजपची पिछेहाट झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने १२ पैकी ६ जागांवर विजय मिळवला होता. तर कॉंग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३ जागांवर यश मिळाले. नेवासा मतदारसंघात शंकरराव गडाख यांनी अपक्ष उमेदवारी करीत विजय मिळवला होता. पाच वर्षात राज्याच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत उभी फूट पडली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत यंदा रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर ‘मविआ’चे उमेदवार विजयी झाले. त्यामुळे मविआचा आत्मविश्वास दुणावला आहे. तर महायुतीने लाडकी बहिण योजनेसह अनेक योजनांचा धडका लावला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे. नगर जिल्ह्यात १२ जागांचे वाटप आणि उमेदवार याबाबत चर्चा रंगली आहे. नगर दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी निकालानंतर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १२ जागा मविआ जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिंदे शिवसेना यांनीही नगर जिल्ह्यावर लक्ष केंद्रित करून रणनीती आखली आहे.
नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. शहर भाजपने एका बैठकीत नगरची जागा भाजपने लढवली पाहिजे असा ठरावच केला आहे.त्यामुळे महायुतीतील हे दोन पक्ष तिढा कसा सोडवतात यावर बरीच गणितं ठरतील. मविआमधील तीनही पक्षांनीही नगर शहराच्या जागेवर दावा केला आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आणि उद्धव ठाकरेंची शिवसेनेकडूनही इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे.
श्रीगोंदा मतदारसंघातून मागील निवडणुकीत भाजपकडून माजी मंत्री बबनराव पाचपुते विजयी झाले होते. आताही हा मतदारसंघ भाजप लढवण्याची शक्यता असून उमेदवारीचा सस्पेन्स मात्र कायम आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अनुराधा नागवडे यांनी काही महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे या मतदारसंघातही महायुतीसमोर जागा वाटपाचा पेच आहे. दुसरीकडे मविआतुनही शरद पवार गट तसेच शिवसेना ठाकरे गटाने या जागेवर दावा केला आहे. खा संजय राऊत यांनी तर साजन पाचपुते उमेदवार असतील हे जाहीरही केले. मात्र स्वतः शरद पवार यांनी श्रीगोंद्यात तुतारीच वाजेल अशी भूमिका घेऊन माजी आमदार राहुल जगताप यांना तयारी करण्यास सांगितल्याचे बोलले जात आहे. याशिवाय जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनीही रणशिंग फुंकले आहे. मागील वेळी निसटता पराभव पत्करावा लागलेले घनश्याम शेलार सध्या कॉंग्रेसमध्ये आहेत. त्यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीगोंदा मतदारसंघात खा. लंके यांना मोठे लीड मिळाले होते. या मतदारसंघात मनसेचे नवले यांनीही तयारी चालविली आहे.
पारनेर नगर मतदारसंघात राणीताई लंके यांनी ‘तुतारी’च्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची तयारी चालविली आहे. त्याचवेळी ठाकरे गटातील इच्छुकांनीही ‘मशाल’ हाती घेण्याची तयारी चालविली आहे. इथला तिढाही दोन्ही पक्ष कसा सोडवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भाजपकडूनही इच्छुक वाढले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनीही चाचपणी सुरू केली आहे. ते स्वतः शरद पवार आणि अजित पवारांच्याही संपर्कात असल्याचे सांगितले जाते. लंकेंनी साथ सोडल्याने अजित पवार या जागेबाबत काय निर्णय घेतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले सुद्धा उमेदवारी साठी इच्छुक आहेत.
शेवगाव पाथर्डी मतदारसंघात यंदा चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. भाजपकडून विद्यमान आमदार मोनिका राजळे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. परंतु त्यांना स्थानिक पातळीवर पक्षांतर्गतच विरोधाचा सामना करावा लागत आहे. पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी तर समर्थका़ंचा मेळावा घेऊन मोनिका राजळे यांना यावेळी थांबण्याचा सल्ला दिला आहे. दुसरीकडे अजित पवार गटात गेलेले माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांच्या पक्षाकडून ॲड. प्रताप ढाकणे यांनी जोरदार तयारी केली आहे. शेवगाव तालुक्यात वर्चस्व असलेल्या हर्षदा काकडे यांनीही कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायची असे सांगून राजकीय रंगत वाढवली आहे. वंचित बहुजन आघाडीने तर या मतदारसंघात प्रा. किसन चव्हाण यांची उमेदवारीही जाहीर केली आहे.
राहुरी मतदारसंघात यंदा पुन्हा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले विरूद्ध विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचा सामना रंगणार आहे. कर्डिले यावेळी श्रीगोंदा मतदारसंघातून लढतीत अशी चर्चा रंगली होती पण आता स्वतः कर्डिले यांनीच राहुरीतूनच लढणार असे सांगून चर्चांना पूर्णविराम दिला आहे. मागील वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी कर्डिले सज्ज झाले आहेत तर तनपुरे यांनीही मंत्री पदाच्या काळात मतदारसंघात केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपली यंत्रणा सक्रिय केली आहे.
नेवासा मतदारसंघात यंदा विद्यमान आमदार शंकरराव गडाख मशाल चिन्हावर लढण्याची शक्यता आहे. त्यांच्या विरोधात भाजपकडून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे किंवा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. गडाख यांना उद्धव ठाकरेंच्या मंत्री मंडळात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे त्यांनीही विकासकामांच्या जोरावर पुन्हा एकदा विजय मिळवण्याचा निर्धार केला आहे.
श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे यांनी पुन्हा उमेदवारीची तयारी केली आहे. या मतदारसंघात महायुतीचे घटक असलेल्या भाजप आणि शिंदे गटाचेही इच्छुक पुढे सरसावले आहेत. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्याही नावाची चर्चा आहे.
शिर्डी मतदारसंघात मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात मविआचा उमेदवार कोण? हा कळीचा मुद्दा आहे. भाजपचेच राजेंद्र पिपाडा यांनी उमेदवारीवर दावा करताना विखेंवर टिकास्त्र सोडले. शिर्डी हा विखे परिवाराचा पारंपरिक मतदारसंघ असल्याने ते निश्चित आहेत. विरोधकांकडून प्रभावती घोगरे यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांना ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, कोपरगावचे विवेक कोल्हे यांची साथ मिळू शकते.
गणेश कारखाना निवडणुकीत थोरात आणि कोल्हे यांनी एकत्र येत विखेंच्या तगड्या पॅनलचा पराभव केला. त्यामुळे आता माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी थेट संगमनेर मतदारसंघातून विधानसभा लढवण्याची तयारी करीत थोरातांना त्यांच्याच घरच्या मैदानावर घेरण्याची रणनीती आखली आहे. तसे झाल्यास संगमनेरची लढत राज्यात लक्षणीय ठरू शकते. विखे विरूद्ध थोरात हा संघर्ष जुना असला तरी आतापर्यंत त्यांनी थेट पणे एकमेकांविरुद्ध निवडणूक लढविली नाही. आताच्या राजकारणात या दोन मातब्बरांचा संघर्ष वेगळ्या वळणावर येऊन ठेपला आहे.
अकोले मतदारसंघात विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांनी तयारी चालवली आहे. भाजपकडून माजी आमदार वैभव पिचड पुन्हा आग्रही आहेत. जागा वाटपात अजित पवार गटाकडे जागा गेल्यास पिचड युतीधर्म पाळणार कि अपक्ष उमेदवारी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युवा नेते अमित भांगरे यांच्या उमेदवारीची शक्यता आहे. ठाकरे गटाचे मधुकर तळपाडे यांनीही उमेदवारीवरून दावा केला आहे.
अजित पवार महायुतीत आल्याने कोपरगाव मतदारसंघातही राजकीय तिढा वाढला आहे. विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी फायनल आहे. परंतु भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनीही निवडणुक लढवण्याचा निर्धार केला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता विधानसभेसाठी त्यांनी तयारी चालवली आहे. कोल्हे ऐनवेळी तुतारी चिन्ह घेऊन काळेंना आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यांनी नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेटही घेतली होती.
कर्जत जामखेड मतदारसंघात यावेळीही हाय व्होल्टेज लढतीची शक्यता आहे. विद्यमान आमदार रोहीत पवार यांना घेरण्यासाठी भाजपसह विरोधक सज्ज झाले आहेत. प्रा. मधुकर राळेभात शरद पवार गट सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना आ. प्रा. राम शिंदे यांनी पाठबळ दिले आहे. त्यामुळे ऐनवेळी शिंदे यांच्या ऐवजी राळेभात भाजपचे उमेदवार असतील अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशा वेळी भाजपमधील इतर इच्छुक काय करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
नगर जिल्ह्यात आजमितीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवारही निवडणुकीत रंग भरू शकतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २५० मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. नगर जिल्ह्यातही पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. युवा नेते अमित ठाकरे यांनी नगरचा दौरा करून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केला आहे. मनविसेचे सुमित वर्मा यांनी तर अमित ठाकरे यांनाच नगर शहरातून विधानसभा निवडणुक लढवण्याची आग्रही विनंती केली आहे.