नगर जिल्ह्यात ठाकरेंची ‘मशाल’ आणि शिंदेंचे ‘धनुष्यबाण’ कोणत्या मतदारसंघात दिसणार?
२०१९ ला एकत्रित शिवसेना शून्यावर अडकली होती…
नगर (सचिन कलमदाणे): विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या जागा वाटपाची उत्सुकता वाढली आहे. पंधरा दिवसांनी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने सर्वच इच्छुक देव पाण्यात घालून बसले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मविआकडून शिवसेना ठाकरे गटाला आणि महायुतीत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किती आणि कोणत्या जागा मिळणार याकडे दोन्ही कडच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. नगर जिल्ह्यात एकत्रित शिवसेनेला अपवाद वगळता मोठे यश मिळालेले नाही. नगर शहरात माजी मंत्री दिवंगत अनिल राठोड यांनी सलग २५ वर्षे शिवसेनेचा भगवा फडकावत ठेवला तर पारनेर मतदारसंघात माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी यांनी यश मिळवले. राठोड यांना युती सरकारमध्ये काही काळ मंत्रिपदाचीही संधी मिळाली होती. राठोड आणि औटी वगळता जिल्ह्यात एकत्रित शिवसेनेची भिस्त कॉंग्रेस, राष्ट्रवादीतून येणाऱ्या प्रस्थापित नेत्यांवरच राहिली आहे. भाजपचे नेते विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काही काळ शिवसेनेचे आमदार होते. कोपरगाव मतदारसंघातही माजी आमदार अशोक काळे यांनी शिवसेनेत प्रवेश करून आमदारकी जिंकली होती. परंतु हे नेते पुन्हा स्वगृही परतले.
सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत तर एकत्रित शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही. मविआ सरकार स्थापन होताना नेवासा मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या शंकरराव गडाख यांनी शिवसेनेला साथ देत मंत्रिपदही मिळवले. शिवसेनेतील सुटीनंतर गडाख यांनी उद्धव ठाकरेंसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांची ठाकरे गटाची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. जिल्ह्यातील इतर मतदारसंघात मात्र ठाकरे गटाला जागा मिळवताना राजकीय मुत्सद्दीपणा दाखवावा लागेल. नगर शहर विधानसभा मतदारसंघ पारंपरिक शिवसेनेचा मानला जातो. मागील दोन टर्म एकत्रित राष्ट्रवादीने या मतदारसंघात विजय मिळवला. राष्ट्रवादीतील फुटीनंतर आता शरद पवार गटाने नगर शहराचा आग्रह धरला आहे. तर ठाकरे गटानेही शहराचा राजकीय इतिहास लक्षात घेऊन पक्षाकडेच ही जागा राहिल अशी आग्रही भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा तिढा कसा सुटणार याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे महायुतीत असलेल्या शिंदे सेनेत सामसूमच पहायला मिळत आहे.
ठाकरे गटाने श्रीगोंदा मतदारसंघावरही दावा करून साजन पाचपुते यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केलेत. मात्र या जागेवर ज्येष्ठ नेते शरद पवार आपला शिलेदार देण्यासाठी आग्रही आहेत. पारनेर मतदारसंघात ठाकरे गटाने फिल्डिंग लावली आहे. मात्र या जागेसाठी शरद पवार गटाचे खा. निलेश लंके आपल्या पत्नीला उभे करण्याच्या तयारीत आहेत. उत्तर नगर जिल्ह्यातही नेवासा वगळता इतर मतदारसंघात ठाकरे गटाच्या हातात जागा लागण्याची शक्यता दिसत नाही. संगमनेर, श्रीरामपूर येथे कॉंग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. कोपरगाव शरद पवार गट सोडणार नाही. अकोले मतदारसंघातही शरद पवार गटच उमेदवार देईल असे चित्र आहे. शिर्डीत जागा मिळाली तरी सध्या ठाकरे गटाकडे विखेंशी दोन हात करेल असा बडा नेता नाही.
त्यामुळे सध्या तरी ठाकरेंची मशाल फक्त नेवासा मतदारसंघात दिसेल असंच काहीसं चित्र आहे.
दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचीही वेगळी परिस्थिती नाही. नगर शहर वगळता इतर मतदारसंघात शिंदेंकडे मातब्बर नेते नाहीत. त्यामुळे शिवसेनेला महायुतीत नगर जिल्ह्यात कोणत्या जागा मिळणार हा प्रश्नच आहे.