तलाठी भरतीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केला होता. याबाबत राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले कील, जिल्ह्यातील दोन महाभागांनी याबाबत आरोप केले होते. मात्र, तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली असून आज आम्ही नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्त पत्र देत आहोत. ही या दोन महाभागांना चपराक असल्याचं म्हणत विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात आणि पवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच, या तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे थोरातांनी सिद्ध करावं, त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध केलं तर मी राजकारणातून बाजूला जाईल आणि थोरात भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी बाहेर जावं, असं आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरात यांना दिले.
माजी महसूलमंत्र्यांच्या काळात तर तहसीलदार, तलाठ्यांच्या बदल्या करण्यासाठी रेटकार्ड होते, असं मी ऐकलं होतं. आम्ही तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने केले. मात्र, ज्यांच्या दिव्याखाली अंधार आहे आणि ज्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत, त्यांनी दुसऱ्यावर आरोप करण्यापूर्वी आपण काचेच्या घरात राहतो हे लक्षात घ्यावं, असं म्हणत विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना लक्ष्य केलं.