Tuesday, February 27, 2024

राम शिंदे, निलेश लंके यांचे सूचक वक्तव्य…नगरमध्ये ‘रामराज्य’ येणार आणि राजकीय शस्त्रक्रिया करू शकतो.

अहमदनगर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली आहे व यामुळे देशात रामराज्य आले आहे. अशाच पद्धतीने नगर जिल्ह्यातही आता ‘रामराज्य’ येणार आहे, असे सूचक भाष्य जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विधान परिषदेचे भाजप आमदार प्रा. राम शिंदे यांनी प्रजासत्ताक दिनी पारनेर तालुक्यातील कोरठण खंडोबा येथे केले. दरम्यान, कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामामुळे फ्रान्सच्या विद्यापीठाने मला डॉक्टरेट दिली आहे. तसा मी डॉक्टर नाही, पण वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया करू शकतो, असे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी यावेळी सूचकपणे स्पष्ट केल्याने जिल्ह्यात तो चर्चेचा विषय झाला आहे.

लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. नगर दक्षिण जिल्ह्यातून भाजपचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याची धारणा त्यांच्या समर्थकांची आहे. मात्र, विधान परिषदेचे भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनीही खासदारकी लढवण्याची इच्छा पक्षाकडे व्यक्त केली आहे तर दुसरीकडे महायुती सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटाचे पारनेरचे आमदार निलेश लंके व त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनीही पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनी (शुक्रवारी, 26 जानेवारी) प्रा. शिंदे व आ. लंके कोरठण खंडोबा येथील यात्रा उत्सवात एकत्र होते. त्यामुळे साहजिकच राजकीय चर्चांना उधाण आले व त्यात सूचक राजकीय भाष्य करीत शिंदे व लंके यांनी भर टाकल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय झाला आहे

कोरठण येथे माध्यमांशी बोलताना प्रा. शिंदे म्हणाले, मी व आ. लंके सर्वसामान्य माणसे आहोत. ग्रामीण भागात राहणारे आहोत. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी महायुतीत आम्ही एकाच सरकारमध्ये काम करीत आहोत. आमची आधीपासून मैत्री आहे. मात्र, आम्ही एकत्र आलो तर चर्चा होते व अशी चर्चा झाली पाहिजे. आम्ही दोघांनी आज खंडोबारायाचे दर्शन घेतले व सदानंदाचा येळकोट म्हणत जागर केला. देवाची आरती केली व तळीही उचलली, असे स्पष्ट करून ते म्हणाले, अयोध्यात श्रीराम मूर्तीची पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रतिष्ठापना झाल्यावर देशात रामराज्य आले आहे व आता नगरच्या लोकसभा क्षेत्रात राम लल्लाची लहर पसरली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यात नक्कीच ‘रामराज्य’ येणार आहे, असे सूचकपणे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना आ. लंके म्हणाले, आम्ही दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील आहोत. एकमेकांविषयी आत्मीयता व प्रेम आहे. मोहटा देवीला जाताना योगायोगाने मी आ. शिंदे यांच्या गाडीचा चालक म्हणजे सारथी झालो व आता देशात रामराज्य आले असल्याने नगर जिल्ह्यातही ‘रामराज्य’ यावे व त्या रामराज्याचा मी सारथी असावे, अशी प्रार्थना खंडेरायाकडे केली आहे. माझ्या राजकीय जीवनातील अडचणीच्या वेळी प्रा. शिंदे यांनी मला मदत केली आहे, असेही आमदार लंके यांनी आवर्जून स्पष्ट केले. मला डॉक्टरेट मिळाल्यावर अन्य कुणाला डॉक्टरेट वा अन्य काही मिळाले त्याबद्दल मला बोलायचे नाही. मी डॉक्टर झालो तरी ऑपरेशन करू शकणार नाही. मात्र, वेळ आली तर राजकीय शस्त्रक्रिया मला करता येईल, असेही आ. लंके यांनी आवर्जून स्पष्ट केले.

कोरठण खंडोबा यात्रेनिमित्त खंडोबा मंदिराच्या पाठीमागे असलेल्या घाटात शुक्रवारी उत्साहात बैल-गाडा शर्यती रंगल्या. आमदार शिंदे व आमदार लंके यांनी या शर्यतींच्या वेळी हजेरी लावून बैल जोड्या घेऊन शर्यतीत सहभागी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले व शर्यतींचा आनंद लुटला. त्यानंतर त्यांनी खंडोबा मंदिरात येऊन दर्शन घेतले. यावेळी कोरठण खंडोबा देवस्थानच्या अध्यक्ष शालिनीताई घुले, सचिव जालिंदर खोसे, उपाध्यक्ष महेश शिरोळे तसेच विश्वस्त मंडळ सदस्य कमलेश घुले, सुवर्णाताई घाडगे, सुरेश फापाळे, चंद्रभान ठुबे, ऍड. पांडुरंग गायकवाड, रामदास मुळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार लंके यांनी बैलगाडा शर्यतीचा किस्सा सांगितला. या शर्यतीत विविध बैल जोड्या गाड्याला जोडल्या गेल्या होत्या. मात्र, त्यापैकी कुणालाही यश मिळाले नाही. मात्र, मी व आमदार शिंदे यांनी ज्या गाड्याला बैलजोडी जुंपली, ती जोडी गाड्यासह इतकी जोमात पळाली की अवघ्या 11 सेकंदात ती घाटाच्या राजा ठरली, असे ते म्हणताच जोरदार हास्यकल्लोळ उडाला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles