नगरः मनोज जरांगे यांची शांतता रॅली सोमवारी (दि. १२) नगर शहरात येत असल्याने या वेळी होऊ शकणाऱ्या गर्दीचा विचार करून नगर शहर व उपनगरातील सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी देण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी संयुक्तपणे परिपत्रक काढून सर्व शाळांना पाठवले आहे. जरांगे। पुण्याहून नगरला येत आहेत. त्यांचे केडगाव उपनगरात स्वागत होणार आहे. तिथून माळीवाडा बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून शहरातून रॅली काढण्यात येणार आहे. चौपाटी कारंजा येथे सांगता होणार आहे. सुमारे ५ हजार स्वयंसेवक नियोजन व व्यवस्थेचे काम पाहत आहेत. या यात्रेत सुमारे चारशे चारचाकी व १ हजार दुचाकी सहभागी होण्याचे नियोजन केले जात आहे.