नगर शहर विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेची चांगली पकड आहे, नगरकरांनी दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांना कायम साथ दिली, त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या उमेदवाराला चांगली संधी आहे, आपण शिवसेनेच्या वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली आहे. तुम्ही तयारीला लागा, शिवसेनेने पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरे जावे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगर शहरातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. या आधारावर शहर मतदारसंघाची जागा ठाकरे गटाच्या वाट्याला आल्याचा दावा केला जात आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार शहरातील ठाकरे गटाचे पदाधिकारी विक्रम राठोड, गिरीश जाधव, मंदार मुळे हे पवार यांच्या भेटीला काल, शनिवारी सायंकाळी पुण्यात गेले होते. या भेटीनंतर या पदाधिकाऱ्यांनी हा दावा केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे तसेच ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
नगर शहर विधानसभा मतदारसंघात दिवंगत माजी आमदार राठोड यांनी भरीव काम केले, त्यांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे. त्यांच्या विचाराचा वारसा पुढे न्या, मी तुमच्या बरोबरच आहे. नगर विधानसभेच्या जागेसंदर्भात शिवसेनेच्या वरिष्ठांशी माझी चर्चा झाली आहे, असे सूचक वक्तव्य करत शिवसेना पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही शरद पवार यांनी केल्याचा दावा विक्रम राठोड यांनी केला आहे.
शरद पवार यांनी शहर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या घडामोडींची माहिती घेतली. ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे, असेही पवार म्हणाले. शरद पवार यांच्या भेटीनंतर नगरची जागा निश्चितच शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सुटेल असा आशावाद विक्रम राठोड यांनी केला. मागील निवडणुकीत अनिल राठोड यांच्याशी गद्दारी करणाऱ्यांना शिवसैनिक धडा शिकवतील, असाही इशारा त्यांनी दिला.