पोस्टरबाजी करणारांनी कोणत्याही नियोजनाशिवाय कामे सुरू करून नगरकरांचे हाल चालवलेत
नगर: नगर कल्याण रोडवरील सीना नदीवरील नवीन पुलाचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू असल्याने या परिसरातील रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सोमवारी सायंकाळी संततधार पाऊस पडला आणि या रस्त्यावरील वाहतूक पुन्हा ठप्प झाली. शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, वयोवृद्ध नागरिकांचे प्रचंड हाल झाले. शहरात सध्या पोस्टरबाजी करून विकासकामांचा गवगवा केला जात आहे. पण विकासकामे करताना कुठलेही नियोजन नाही. नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा कोणताही विचार न करता ऐन पावसाळ्यात केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामे सुरू करण्यात आली आहेत. मागील महिन्यातच सीना नदीला पूर आल्याने कल्याण रोडवरील वसाहतींचा नगर शहराशी संपर्क तुटला होता. त्यावेळी अधिकऱ्यांसमवेत पाहणीचे फोटो सेशन करण्यात आले. प्रत्यक्षात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी कोणतीही उपाययोजना झाली नाही हे कालच्या पावसाने सिद्ध झाले आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी केली आहे.
अभिषेक कळमकर यांनी म्हटले आहे की, केन्द्र सरकारच्या निधीतून कल्याण रोडवरील सीना नदीवर नवीन पूल बांधण्यात येत आहे. या कामाचे श्रेय घेऊन लोकसभा निवडणूकीपूर्वी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. अवघ्या दीडशे ते दोनशे मीटर लांबीच्या या पूलाचे काम ऑगस्ट अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु अजून ३० टक्के कामही झालेले नाही. याच गतीने काम सुरू राहीले तर पुढील पावसाळ्यातही काम पूर्ण होईल की नाही अशी शंका आहे. शहरातील स्टेशन रोडवरील मोठा पूल दीड पावणेदोन वर्षात तयार झाला. मग या छोट्याशा पुलाच्या कामात माशी कुठे शिंकली याचे उत्तर नगरकरांना मिळाले पाहिजे. अशी कामे पावसाळ्यानंतर हाती घ्यावी इतकं साध व्हिजनही कामाचं श्रेय घेणाऱ्यांना नाही हे नगरचे दुर्दैव आहे. विकास फक्त पोस्टर लावून होत नाही तर त्यासाठी योग्य नियोजन हवे असते. सीना नदीवरील पुलाचे काम संबंधित यंत्रणेने दिवाळीपूर्वी पूर्ण करावं अन्यथा ऐन दिवाळीत संबंधित यंत्रणेच्या कार्यालयात आंदोलनाचे फटाके फोडू असा इशारा कळमकर यांनी दिला आहे.