Saturday, October 5, 2024

Ahmednagar news:बिबट्यांची दहशत गावोगावी पिंजरा लावण्याची नागरिकांची मागणी

राहुरी शहरांसह तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून अनेक ठिकाणी बिबट्यांनी शेतकर्‍यांच्या पाळीव प्राण्यांना ठार केल्याच्या घटना घडत आहे. तसेच काही ग्रामस्थांवर रस्त्याने जाताना बिबट्यांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. तरी वनविभागाने या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी गावोगावी पिंजरे लावून मोठी मोहिम राबवावी, अशी मागणी या परिसरातून होत आहे.

तालुक्यातील राहुरी शहर, बारागाव नांदूर, देवळाली प्रवरा, ब्राम्हणी, उंबरे, डिग्रस तसेच पुर्व भागातील तांदूळवाडी, आरडगाव, कोंढवड, शिलेगाव, केंदळ, मानोरी, वळण, मांजरी, मुसळवाडी, पाथरे आदी गावांमध्ये दिवसा बिबट्यांचे दर्शन व पाळीव प्राण्यांवरील हल्ले नित्याचे झाले आहे. त्यामुळे या भागात मोठी दहशत पसरली असून काही शेतकर्‍यांवरही या बिबट्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी जंगलात वास्तव्यात करणार्‍या बिबट्यांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे. तसेच राहुरी तालुक्यातील पुर्व भागात भरपूर पाणी, उसाचे मळे, गिन्ही गवत यामुळे बिबट्यांना पोषक वातावरण असल्याने या भागात ते तळ ठोकून आहे. हे बिबटे भक्ष्यासाठी शेतकर्‍यांच्या पाळीव शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, कोंबड्या, कालवड आदी प्राण्यांना ठार मारत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांची, ग्रामस्थांची आर्थिक हानी होत आहे.

अनेकदा शेतात काम करणार्‍या महिला, पुरुष, मुलांवर जीवघेण्या हल्ल्याचे प्रमाण वाढले. आहे. तालुक्यात यापूर्वी दोन-तीन लहान मुले व दोन महिलांचाही बळी गेलेला आहे. अनेक महिला पुरुष गंभीर जखमी झालेले आहेत. त्यामुळे रानात, शेतात कामासाठी जाण्यास भीती निर्माण झाली आहे. प्रत्येक गावामध्ये दोन ते पाचपर्यंत बिबट्यांची संख्या असल्याचे प्रत्येक गावातील ग्रामस्थ व शेतकरी सांगतात. विशेषतः वाड्या-वस्त्यावरील ग्रामस्थांना अनेकदा पिकात, रस्त्यावर एकापेक्षा जास्त बिबटे दृष्टीस पडलेले आहेत. बिबट्यांची ही वाढती संख्या चिंतेची बाब झाली असून संध्याकाळी सहा वाजल्यानंतर घराबाहेर पडणे, शेतात जाणे जिकरीचे बनले आहे.

अनेक बिबट्यांसमवेत त्यांची बछडे असल्याने त्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाला अडचणी निर्माण होत आहे. त्याच प्रमाणे वनविभागाकडे या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी तुटपुंजी यंत्रणा असल्याचे समजते. तसेच बिबट्यांची संख्या जास्त असल्याने वनविभाग ही हतबल झाल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हा वनविभागाने राहुरी तालुक्यातील बिबट्यांसाठी विशेष मोहिम राबवून या बिबट्यांना जेरबंद करून शेतकरीवर्ग व ग्रामस्थांना भयमुक्त करावे, अशी मागणी होत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles