Sunday, September 15, 2024

Ahmednagar news:वसंतराव नाईक महामंडळाच्या व्यवस्थापक साडेपाच हजारांची लाच घेताना पकडले

अहमदनगर-येथील वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या प्रभारी जिल्हा व्यवस्थापकाला एका व्यावसायिकाकडून साडेपाच हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. दत्तू आश्रुबा सांगळे (रा. सावेडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल, सोमवारी ही कारवाई केली.

नगर शहरातील एका व्यक्तीचा इलेक्ट्रॉनिकचा व्यवसाय आहे. त्यांना त्या व्यवसायासाठी कर्जाची आवश्यकता असल्याने त्यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे राबविण्यात येणार्‍या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरला होता. सदर कर्ज व्याज परतावा योजनेचे ऑनलाईन प्रकरण प्रादेशिक कार्यालयाकडे पाठविण्याकरिता सांगळे याने लाचेची मागणी केली असल्याची तक्रार व्यावसायिकाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 24 ऑगस्ट रोजी केली होती. प्राप्त तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 24 ऑगस्ट रोजीच लाच मागणी पडताळणी केली असता सांगळे याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष साडेपाच हजार रुपये लाच मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले होते.

यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल, सोमवारी आयोजित केलेल्या लाच कारवाई सापळ्यादरम्यान सांगळे याला तक्रारदारांकडून साडेपाच हजार रुपये स्वीकारताना पथकाने पकडले. दरम्यान, सांगळे हा वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर येथे प्रादेशिक व्यवस्थापक पदावर कार्यरत असून त्याच्याकडे नगर जिल्हा व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त पदभार आहे. सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस अंमलदार किशोर लाड, बाबासाहेब कराड, रवींद्र निमसे, सचिन सुद्रुक, दशरथ लाड यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles