नगर : नगर अर्बन सहकारी बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणातील गुन्ह्यात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने राजेंद्र शांतीलाल लुनिया व प्रदीप जगन्नाथ पाटील या दोन शाखा व्यवस्थापकांना आज, बुधवारी सायंकाळी अटक केली. अर्बन बँकेसंदर्भातील गुन्ह्यात प्रथमच आरोपींना अटक झाली आहे.
अर्बन बँक बचाव समितीचे प्रमुख तथा बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्जदार यांच्या विरोधात सुमारे दीडशे कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचे गुन्हे पोलिसांकडे दाखल झाले आहेत.
राजेंद्र लुनिया हा बँकेच्या शहरातील बाजार समिती शाखेचा तर प्रदीप पाटील हा केडगाव शाखेचा व्यवस्थापक म्हणून काम करत होता. दोघांनाही गुरुवारी न्यायालयपुढे हजर केले जाणार आहे. बँकेचा परवाना भारतीय रिझर्व बँकेने रद्द केला असून, बँकेवर अवसायकाची नेमणूक करण्यात आली आहे. पैसे परत मिळावेत, यासाठी ठेवीदार आंदोलन करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ठेवीदारांना दोषींवर लवकरच कारवाई होईल, असे आश्वासन दिले होते.