नगर : शरद पवार यांनी नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची, आमची चिंता करू नये. जिल्ह्यातील सहकारी संस्था चालवण्यासाठी जिल्ह्यातील नेतृत्व समर्थ आहे. राज्यातील सहकार क्षेत्र शरद पवारांनी स्वत: आपल्याच भोवती ठेवले होते. त्यांचे वर्चस्व संपुष्टात आल्याची खंत त्यांना वाटत असावी, अशी टीका महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली आहे.
मंत्री विखे यांनी शुक्रवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात विविध योजनांच्या आढावा बैठका घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जीएस महानगर बँकेच्या मुंबईतील कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कारभाराबाबत आपल्याला चिंता वाटते असे वक्तव्य केले होते. या बँकेवर सध्या मंत्री विखे यांचे वर्चस्व आहे. त्यांच्याच प्रयत्नातून काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भाजपचे शिवाजी कर्डिले यांच्याकडे गेले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी नगर जिल्हा बँकेच्या कारभाराबाबत चिंता व्यक्त केली. त्यावर मंत्री विखे यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली