खा. चव्हाण, ना. महाजन व ना. गावित यांची उपस्थिती
अहमदनगर: “महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस श्री. विनायकराव देशमुख यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.”
भारतीय जनता पक्षाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन, मंत्री ना. विजयकुमार गावित मा.आ.अमर राजूरकर, अहमदनगर दक्षिणेचे भाजपा अध्यक्ष श्री. दिलीपराव भालसिंग, कोषाध्यक्ष श्री.दादासाहेब बोठे व पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असतानाच काँग्रेस मधील अनेक नेते आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करीत आहेत. विशेष म्हणजे प्रवेश करणाऱ्यांनी कोणतीही अट न घालता पंतप्रधान मोदींच्या विकसित भारत संकल्पनेला साथ देण्यासाठी भारतीय जनता पार्टी भक्कम करण्याच्या उद्देशाने प्रवेश केलेला आहे. काँग्रेस मधील अशा अनुभवी पदाधिकाऱ्यांना भारतीय जनता पार्टी काम करण्याची योग्य संधी देऊन त्यांचा सन्मान करेल”, अशी मी ग्वाही देतो.
यावेळी काँग्रेसचे नंदुरबार येथील माजी मंत्री श्री. पद्माकर वळवी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव श्रीमती अर्चना राठोड, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. मनोज कुमार सोनवणे व अन्य अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.
भाजपात प्रवेश केल्यानंतर माध्यमांशी बोलताना श्री. देशमुख म्हणाले, “१९९० सालापासून मागील ३४ वर्ष मी काँग्रेस पक्ष संघटनेत प्रामाणिकपणे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने प्रगती करीत असून या राष्ट्र उभारणीच्या कार्यात प्रत्येकाने सहभागी होण्याच्या भावनेने मी आज भाजपा प्रवेश केला आहे. पुढील काळात भारतीय जनता पार्टी जो आदेश देईल, त्याप्रमाणे आपण काम करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले