संगमनेर -तालुक्यातील निमगाव टेंभी येथील महिलेला बिबट्याने गिन्नी गवताच्या शेतात ओढत नेवून ठार केले. ही घटना बुधवारी (दि.११ सप्टेंबर) सकाळी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले असून तातडीने पिंजरा लावण्याची मागणी होत आहे.
यावेळी त्यांनी मोठ्याने आरडाओरड केली. याचा आवाज आल्याने त्यांचे दीर प्रवीण वर्पे यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा बिबट्या त्यांना शेतात ओढत नेत असल्याचे दिसले. यावेळी त्यांनीही आरडाओरड केला आणि हा आवाज ऐकून जवळच असलेल्या तीन ते चार जणांनी धाव घेतली.
समोरच बिबट्या संगीता यांच्या मानेला तोंडात धरून बसला होता. यावेळी आवाज झाल्याने बिबट्याने लगेचच धूम ठोकली. यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या संगीता यांना औषधोपचारासाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती समजताच उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन लोंढे यांनी धाव घेत माहिती घेतली. या नरभक्षक बिबट्याच्या दहशतीमुळे निमगाव टेंभी येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.