अहमदनगर : काहींनी अपंगत्व नसताना दिव्यांग असल्याचे दाखले दिले तर काही महिलांनी कागदोपत्री घटस्फोट घेतले व इच्छित स्थळी आपली बदली करवून घेतली. जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे हे कारनामे आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. कोतवाली पोलिसांनी झेडपीच्या शिक्षणाधिकार्यांकडे पाच वर्षांतील शिक्षक बदलीचे रेकॉर्डच मागितल्याने खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात मात्र कागदोपत्री ज्या नवर्यांपासून घटस्फोट घेतला, त्याच्याशीच या महिला शिक्षकांचा संसार सुरळीत सुरू असल्याच्याही चर्चा झेडपी वर्तुळात आहेत.
जिल्हा परिषदेमध्ये आंतरजिल्हा बदली अंतर्गत झालेल्या बदल्यांमध्ये अपंगत्वाचे तसेच घटस्फोटाचे खोटे दाखले सादर करून बदली करून घेतलेल्या सुमारे 200 शिक्षकांची हवा टाईट झाली आहे. गेल्या पाच वर्षात म्हणजे 2017 ते 2022 या काळात बदली झालेल्या शिक्षकांची यादी आणि बदलीचे कारण जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून नगरच्या कोतवाली पोलीसांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. याप्रकरणी नगरमधील शिक्षक विकास भाऊसाहेब गवळ जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासह कोतवाली पोलीसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनूसार कोतवाली पोलीसांनी बदली झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली आहे.
आंतर जिल्हा बदलीअंतर्गत २०१७ ते २०२२ या पाच वर्षांत बनावट दाखले दिल्याची ही तक्रार आहे. याबाबत जिल्हा परिषदेकडे अनेक संस्था व संघटनांनी चौकशीची मागणी केली होती. मात्र, राजकीय दबावाने ती झालीच नाही. त्यामुळे आता पोलिस अधीक्षकांकडे येथील विकास गवळी (राहणार भिस्तबाग, अहमदनगर) यांनी तक्रार केली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी चौकशी सुरू केली आहे. जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्यांना पत्र पाठवून गेल्या पाच वर्षांत अशा पद्धतीने आंतरजिल्हा बदलीवरून हजर झालेल्या शिक्षकांच्या नावांची यादी व बदलीचे कारण याची माहिती देण्याचे सांगितले आहे.
अशा बदल्यांबाबत झेडपीमध्ये दबक्या आवाजात नेहमी चर्चा असे. पण, आत्तापर्यंत कोणी लेखी तक्रार केली नव्हती. पण गवळी यांनी धाडस करून याबाबत पुढाकार घेतला व थेट जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून त्यात संशयितांची नावे देखील त्यांनी दिली आहेत. त्यावरून अशा दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी त्यांची मागणी आहे.
अपंगत्व व घटस्फोट प्रकरणात खोटे दाखले देऊन बदल्या करून घेतल्याची तक्रार झाली असतानाच जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये देखील काही महिला शिक्षिकांनी परितक्त्या असल्याचे खोटे दाखले देऊन आपल्या बदल्या करून घेतल्या आहेत व अशा महिला शिक्षिका आजही आपल्या नवरोबांबरोबर राहात आहेत. त्यांच्याबद्दलही आता त्यांच्या नावानिशी तक्रारी होणार असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात ज्या नवर्यापासून त्यांनी घटस्फोट घेतला, त्याच्याबरोबरच आजही त्यांचा संसार सुरू असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता पोलिसांच्या चौकशीत काय पुढे येते, याची जिल्हा परिषदेच्या वतुर्ळात उत्सुकता आहे.