प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची तोफ अहमदनगर मध्ये धडाडणार आहे. महाराष्ट्रात विविध ठिकाणी निर्भय बनोच्या जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. त्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांची गर्दी होत आहे. ९ फेब्रुवारीला पुण्यात झालेल्या वागळेंच्या सभेपूर्वी चार ठिकाणी वागळे, ॲड. असीम सरोदे, डॉ. विश्वंभर चौधरी यांच्या गाडीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सभेला विरोध करत हल्ला केला होता. अंडी, शाई फेकली होती. त्यानंतर आता येत्या मंगळवार दि. २० फेब्रुवारीला वागळे यांची सभा नगर शहरात आयोजित करण्यात आली आहे. अहमदनगर लोकशाही बचाव मंचाने यासाठी पुढाकार घेतला आहे.
सायंकाळी ५.३० वा. माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन येथे सभा होणार आहे. लखनऊ व नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ऐतिहासिक इंडियन सायन्स काँग्रेसचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सर्जेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. सभा आयोजना बाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मंचाचे कार्यकर्ते किरण काळे, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, दीपक ससाणे, इंजि. सुजित क्षेत्रे, देवराम शिंदे, विलास उबाळे, अनिस चुडीवाला आदींनी दिली आहे. संविधान संरक्षणाचे उद्दिष्ट समोर ठेवत सक्षम नागरी चळवळ उभी करण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे. नुकतीच मंचाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे वागळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत निमंत्रण दिले. सामाजिक कार्यकर्त्या निशाताई शिवूरकर (संगमनेर) देखील सभेला संबोधित करणार आहेत.
डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, प्राध्यापक, शिक्षक, इंजिनिअर, पत्रकार, उद्योजक, व्यापारी, साहित्य, कला, संगीत, कामगार, कष्टकरी, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींसह विविध घटकातील नगरकर सभेला उपस्थित असणार आहेत. विचार मंचाचे विचार ऐकण्यासाठी सभा सर्वांसाठी खुली आहे. सभेला नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन मंचाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांच्या वतीने हेल्पलाईन मोबाईल क्रमांक 9922914264 उपलब्ध करून देण्यात आला आहे.