अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी एक व्हीडिओ ट्विट करत नगरच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएम मशीन्सच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला. यामुळे मोठी खळबळ उडाली असून आता निलेश लंकेंनी मोठा निर्णय घेतला आहे
दरम्यान, ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाबाहेर लंके यांचे कार्यकर्ते देखील लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्या हा सर्व प्रकार लक्षात येताच त्यांनी संबंधित व्यक्तीला विचारपूस केली असता, त्याने आपण तांत्रिक विभागातील असल्याची माहिती दिली. मात्र, गोदामाच्या बाहेरील केंद्रीय सुरक्षा विभाग, राज्य सुरक्षा विभाग आणि स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असताना सुद्धा एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता थेट गोदामाच्या शटरजवळ जातेच कशी? असा सवाल लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केला. संबंधित व्यक्ती रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी त्या परिसरात आल्याची माहिती देण्यात आलीये. त्याचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले असून या निमित्ताने ईव्हीएम ठेवलेल्या गोदामच्या सुरक्षेबाबत लंके समर्थकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
EVM सुरक्षाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर निलेश लंके यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री घडलेल्या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी लंके यांनी बोलल्याचे सांगितलं असून रात्री त्यांनाही संबंधित व्यक्ती कोण आहे हे माहित नव्हतं असं लंके यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकाराबाबत आपण रीतसर तक्रार करणार आहोत, अशी माहिती निलेश लंके यांनी दिली आहे.