निलेश लंके यांनी प्रचारादरम्यान महत्त्वाचं वक्तव्य केलंय. लोक मला नोटही देतात आणि व्होटही देतात, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी खिशातून पैसे काढून दाखवत कुणी, किती रुपये दिले,याचीही माहिती दिली. सर्वसामान्य लोकांकडूनच आपल्याला आर्थिक मदत मिळत असल्याचं निलेश लंके यांनी नमूद केलं आहे. ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर लंकेंनी केलेलं हे वक्तव्य आता चांगलंच चर्चेत आलं आहे. एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले १०० रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने कष्टाने कमवलेले ५०० रुपये निवडणुकीसाठी मला मदत दिली, असंही निलेश लंकेंनी यावेळी सांगितलं आहे. अहमदनगरच्या माहीजळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा गेली होती. त्यावेळी तेथे देखील एका शेतकऱ्याने त्यांना आर्थिक मदत दिली आहे.
स्वाभिमान जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून लोक भरभरुन प्रेम देत आहेत. प्रत्येक सभेत आपल्याला आर्थिक मदत मिळत आहे. शेतकरी कांद्याची पट्टी, सेवा निवृत्त शिक्षकांने एक महिन्याची पेन्शन दिल्याचा किस्सा देखील लंके यांनी यावेळी सांगीतला. फक्त किस्से सांगितले नाही, तर पुरावा म्हणून त्यांनी खिशातील ५०० आणि हजाराच्या नोटा देखील काढून दाखवल्यात.