Thursday, March 27, 2025

केवळ दाळ साखर वाटून मते मिळणार नाहीत, नगरच्या पाण्यासाठी त्यांनी काही केलं नाही, लंकेंचा विखेंवर निशाणा

नगर जिल्ह्यावर गेली पन्नास वर्षे अक्षरशः राज्य करणाऱ्या विखे-पाटील कुटुंबियांना जिल्ह्यामध्ये साधं एक शासकीय मेडिकल कॉलेज आणता आले नाही. त्यांनी विकासाच्या केवळ पोकळ गप्पा केल्या असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित असणारे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी केला. जिल्ह्यामध्ये उत्तमोत्तम शिक्षणसंस्थांचे जाळे असायला हवे पण विखेंच्या नाकर्तेपणामुळे होतकरुन व हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जिल्ह्याच्या बाहेर जावे लागते अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

विखे पाटील कुटुंबियांना जिल्ह्यातील सिंचनाचे प्रश्न देखील सोडविण्यात अपयश आला असा आरोप करुन लंके म्हणाले की “गेली पाच वर्षे मी आमदार असताना जवळपास प्रत्येक कालवा समितीच्या बैठकीला उपस्थित राहिलो आहे. परंतु विद्यमान खासदार महोदय कधीही या बैठकीला हजर राहिल्याचे मला दिसले नाही. तुमच्या पक्षाचे कितीही आमदार-खासदार जिल्ह्यामध्ये असो परंतु जेंव्हा आपापल्या भागाचा पाणीप्रश्न येतो तेंव्हा प्रत्येकजण आपापल्या भागाच्या पाण्यासाठी कालवा समितीत आपली बाजू मांडत असतो. नगरच्या जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी त्यांची बाजू मांडण्यासाठी विद्यमान खासदार महोदय कधीही उपलब्धच झाले नाहीत.” जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणीप्रश्न त्यांच्या उदासीनतेमुळे ‘जैसे थे’ आहे आरोप देखील लंके यांनी केला.
आजघडीला शेतकऱ्यांची मोठी दयनीय अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा. त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे यासाठी खासदारांनी त्यांची बाजू संसदेत मांडणे अपेक्षित असते. परंतु खासदारांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वेदना केंद्रापर्यंत मांडल्याच नाहीत. त्यांनी फक्त डाळ-साखर वाटण्याचे काम केले. केवळ डाळ-साखर वाटून मते मिळतील असा त्यांचा समज असेल तर तो चुकीचा आहे, असेही लंके यावेळी म्हणाले.
दरम्यान, निलेश लंके यांनी काढलेल्या नगर दक्षिण स्वाभिमान यात्रेला उदंड प्रतिसाद मिळत असून नागरीक स्वतःहून या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. अनेक गावांमध्ये तर अक्षरशः नागरीक पहाटेपर्यंत वाट पाहताना दिसत आहेत. स्वतः निलेश लंके गावांमध्ये गेल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत अगदी सहजतेने वावरताना दिसत असून त्यांच्या साधेपणाची सर्वत्र चर्चा आहे. दरम्यान, पारगाव येथे आयोजीत सभेला याप्रसंगी आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles