Saturday, February 15, 2025

दिल्ली अब दूर नही! टॅग लाईनने उडवली धूम..आ.लंके काय निर्णय घेणार याची उत्सुकता शिगेला!

अहमदनगर -राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण कमी-अधिक प्रमाणात तापण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोग येत्या आठवड्यात आचारसंहिता लागू करत निवडणुकांच्या तारखा घोषित करू शकतो. या परिस्थितीत महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटप आणि संभाव्य उमेदवार यावर चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. शिंदे-फडणवीस-पवार यांच्या दिल्लीवाऱ्या सुरू असताना मविआ मधेही जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच आहे. त्यात वंचितने मविआ’ला चांगलेच कोंडीत पकडले आहे. एकूणच महायुती आणि मविआ मधील जागांच्या खेचाखेचीत संभाव्य उमेदवार कोण अशी मोठी उत्सुकता आहे. या परिस्थितीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तर कधी नव्हे ती अनिश्चितता निर्माण झाल्याचे चित्र असून सद्य परस्थितीत आ.निलेश लंके यांनी मोठाच ट्विस्ट निर्माण केला आहे. आजच्या परस्थितीत निलेश लंके हे चर्चेच्या केंद्रस्थानी असून ते काय निर्णय घेतात यावर अनेक राजकीय गणिते फिरण्याची शक्यता असल्याची मोठी चर्चा आहे.
आ.निलेश लंके यांचा रविवारी(10 मार्च) वाढदिवस असून या निमित्ताने सोशल माध्यमात, जाहिरातीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने फिरत असलेली जाहिरातीने अनेकांचे लक्ष वेधत भुवया उंच केल्या आहेत. “दिल्ली अब दूर नही” असे वाक्य असताना संसदेचे चित्र असून त्यावर शरद पवार आणि अजित पवार या दोघांचे फोटो लक्षवेधी ठरत आहेत. आ.निलेश लंके आणि राणी लंके यांचे छायाचित्र ठळकपणे यावर आहे. सर्वसामान्य जनतेचा हक्काचा नेता आ.निलेश लंके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा’ असा मजकूर त्यात आहे. एकूणच या व्हायरल जाहिरातीने एक प्रकारे राजकीय खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे.

-आ.निलेश लंके यांनी अजूनही स्पष्ट पणे आपण लोकसभा लढवणार आणि ती या पक्षाकडून लढवणार यावर भाष्य केलेले नाही. वरिष्ठ देतील तो आदेश मानणारा मी एक छोटा कार्यकर्ता असल्याचे पालुपद त्यांनी कायम ठेवले आहे. राणी लंके यांच्या शिवस्वराज्य यात्रेत किमान त्यांनी सुरुवातीला लोकसभा लढवणारच असे म्हंटले होते. मात्र नंतर त्यांनीही आ.निलेश लंके आणि वरिष्ठ जे निर्णय घेतील त्या प्रमाणे निर्णय घेऊ अशी सुधारणा केली. नुकतेच निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने “शिवपुत्र संभाजी” या महानाट्याचे आयोजन करण्यात आले. या महानाट्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच या निमित्ताने आ.राम शिंदे, युवानेते विवेक कोल्हे या भाजप नेत्यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावत केलेली भाषणबाजी बरीच सूचक आणि बरेच काही सांगून जाणारी होती. तसेच महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट,शिवसेना ठाकरे गटाच्या शहर आणि जिल्ह्यातील नेत्यांनी झाडून उपस्थिती लावत आ.लंकेंनी मविआ मधून राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी करावी अशी जाहीर अपेक्षा व्यक्त करत गळ घातली. खुद्द “शिवपुत्र संभाजी” महानाट्याचे सर्वेसर्वा खा.अमोल कोल्हे यांनीही आ.निलेश लंके यांना समारोपाच्या प्रयोगा नंतर हातात तुतारी घेण्याचे आवाहन केले. एकूणच आ.निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादी मधून लोकसभेला भाजप उमेदवार विद्यमान खा.सुजय विखे यांच्या विरोधात मैदानात असतील अशी चर्चा झडू लागली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest Articles