पारनेर येथील हल्ल्यात जखमी झालेल्या राहुल झावरे यांची खासदार निलेश लंके यांनी भेट घेतली. दरम्यान, श्रीगोंदा येथे असलेल्या खासदार लंके यांनी आपला भेटीचा दौरा अर्ध्यावर सोडत राहुल झावरे यांना भेटण्यासाठी नगर गाठलं आणि रुग्णालयात जाऊन प्रकृतीची चौकशी केली. झावरे यांच्या मणक्याला आणि पोटाला मार लागला आहे. पारनेर येथीलच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून ही मारहाण झाली आहे, गुन्हेगार कोणीही असो त्याला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचं खासदार लंके यांनी यावेळी म्हटलं. आता, निवडणूक संपली आहे, तुमचा विजय झाला तरी पचवता आला पाहिजे आणि पराभव झाला तरी पचवता आला पाहिजे, असं म्हणत लंके यांनी सुजय विखेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
दरम्यान, या घटनेतील जे गुन्हेगार आहेत त्यांची निवडणूक काळातील भाषणं पाहिली तर ते अशा आविर्भावात होते की, आम्हाला कोणी काही करू शकत नाही. पण, या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी सर्व कार्यकर्त्यांना शांततेची भूमिका घ्यावी, असं आवाहन केलं आहे, असं देखीलही लंके यांनी म्हटले.