आधीच ‘मविआ’चे नेते अंतर राखून त्यात समर्थकाची आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप
प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच निलेश लंके बॅकफूटवर गेल्याची चर्चा
नगर: नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असताना भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माजी आ. निलेश लंके यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निलेश लंके यांनी जन संवाद यात्रा काढून वातावरण निर्मितीचा प्रयत्न चालवला आहे. तर दुसरीकडे खा. सुजय विखे पाटील यांनी महायुतीतील घटक पक्षांना एकत्रित आणत महाविजय मिळवण्यासाठी रणनीती आखली आहे. प्रचाराच्या या पहिल्या टप्प्यात विखे महायुतीतील प्रभावशाली नेत्यांची मोट बांधण्यात यशस्वी होत आहेत. त्याचवेळी निलेश लंके यांच्या बाजूने त्यांचा स्वतःचा पक्ष वगळता महाविकास आघाडीतील एकही बडा नेता अद्याप मैदानात उतरलेला नाही. उलट खा. विखेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या लंके समर्थकांच्या आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने लंके सुरूवातीलाच बॅक फूटवर जात असल्याचे चित्र आहे.
पारनेर मतदारसंघ हक्काचा मतदार संघ असूनही लंकेंविरोधात तिथे मोठे वातावरण निर्माण होत आहे. विधानसभेला ज्यांनी तोलामोलाची साथ दिली असे माजी नगराध्यक्ष विजय औटींसारखे नेते लंके पासून दुरावले आहेत. औटी यांनी मुंबईत पारनेरकरांचा मेळावा घेऊन लंकेंना मुंबईतून मिळणारी सर्व प्रकारची रसद तोडण्याच्या दृष्टीने फिल्डिंग लावली आहे. याचवेळी लंके समर्थकाची विखेंना थेट धमकी देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने लंके यांच्या दहशतीच्या राजकारणाचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. लंके महाविकास आघाडीचे उमेदवार असले तरी पाथर्डी, राहुरी दौऱ्यात ॲड. प्रताप ढाकणे, आ. प्राजक्त तनपुरे वगळता मविआमधील कोणीही मोठा नेता, पदाधिकारी त्यांच्या सोबत नसल्याचे पहायला मिळत आहे. नगर शहरात आमदार संग्राम जगताप यांनी विखेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा घेतला, जिल्हा राष्ट्रवादीच्या मेळावाही झाला. माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, राजेंद्र नागवडे, बाळासाहेब नाहटा अशा दिग्गजांनी विखेंना ताकद देण्याचे जाहीर केले. दुसरीकडे लंके यांच्यासाठी नगर शहरात शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांनी साधी एक बैठकही अद्याप घेतलेली नाही. उर्वरित मतदारसंघातही अशीच परिस्थिती आहे. मविआचे नेते अजूनही वेट अँड वाचच्या भूमिकेत असल्याने लंके यांच्या समोर आव्हान वाढणार आहे.