निंबळक बायपास शहराबाहेरून जाणाऱ्या व विळद ते केडगाव या बाह्यवळण रस्त्त्यावरील निंबळक शिवारातील चौकात सोमवारी (दि.६) सकाळी हिवरे बाजार येथून एमआयडीसीत कामाला येत असलेल्या युवकाच्या मोटारसायकलला भरधाव वेगातील मालट्रकने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे.
नितीन रामभाऊ कदम (वय ३७, रा. हिवरेबाजार, ता.नगर) असे मयताचे नाव आहे. तर त्या सोबत मोटारसायकल वर असलेला दिनेश शांताराम नेमण (वय ३१, रा. निंबऴक, ता.नगर) हा जखमी झाला आहे. मयत नितीन कदम हा एमआयडीसीतील एका कंपनीत काम करत होता. सोमवारी (दि.६) सकाळी नेहमी प्रमाणे तो मोटारसायकलवर गावातून एमआयडीसी कडे येत होता. निंबळक येथे दिनेश नेमण हा त्याच्या गाडीवर बसला. दोघे एमआयडीसीकडे जात असताना बायपास चौकात भरधाव वेगात आलेल्या मालट्रक ने (क्र.जी.जे.०२ एटी ९६९८) त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. त्यामुळे रस्त्यावर पडून नितीन कदम हा गंभीर जखमी होऊन मयत झाला. तर दिनेश नेमण हा जखमी झाला.
याबाबत दिनेश नेमण याने दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनोळखी ट्रकचालका विरुद्ध भा.दं.वि.कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मोटार वाहन कायदा १८४,१३४ (अ) (ब) १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. मयत नितीन कदम याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे.
दुसरा अपघात रस्त्यावर असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज चौक (माळवाडी सर्कल) या ठिकाणी घडला. दुसऱ्या अपघातामध्ये देखील एका जणाचा जागीच मृत्यू झाला असून अध्याप दोघांचीही ओळख पटली नसून पुढील तपास पोलीस करत आहे.
निंबळक बायपास चौकात दररोज अपघात होत आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे. बायपास झाल्यामुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. हा रस्ता नगर-मनमाड महामार्गाला जोडला असून याच चौकात अपघाताची मालिका चालू आहे. या चौकात गतिरोधक नसल्यामुळे वाहने जोरात येतात. पर्यायी अपघाताला सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे. अपघात झाल्यानंतर वाहतुकीची कोंडीही मोठया प्रमाणात होते. या चौकात गतिरोधक बसवावे अन्यथा बायपासला रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा अजय लामखडे यांनी दिला आहे.