नगर (प्रतिनिधी)- राजकारणात नितीश कुमार हे पलटूराम म्हणून ओळखले जातात व आता त्यांच्या जोडीला चंद्रबाबू नायडू यांच्या कुबड्या मोदी सरकारला आहेत. त्यामुळे येत्या एक-दोन वर्षात हे दोघेही मोदी सरकार पाडतील, असा दावा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अजयसिंह यादव यांनी मंगळवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केला. मोदी सरकार पडल्यावर इंडिया आघाडी सरकार स्थापन करू शकते. मात्र मोदी तसे होऊ न देता नव्याने निवडणुका देशावर लादतील, असा दावाही कॅप्टन यादव यांनी केला.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचा मेळावा पँरेडाईज सभागृहात झाला. यावेळी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, राष्ट्रीय समन्वयक मंगलताई भुजबळ आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रातील मोदी सरकार पाडण्याचे कोणतेही प्रयत्न इंडिया आघाडी करीत नाही. मात्र या सरकारच्या नितीशकुमार व चंद्रबाबू या दोन कुबड्याच हे सरकार पाडेल, असा दवा करून कॅप्टन यादव म्हणाले, यामुळेच केंद्राच्या यंदाच्या बजेटमध्ये निवडणुका होत असलेल्या महाराष्ट्र, झारखंड व हरियाणाला पैसे न देता केवळ नितीश कुमार व चंद्राबाबूला पैसे दिले आहेत. शिवाय मोदी स्वतःला देवता मानतात. अहंकार त्यांच्यात आहे, चारसो पार नारा संविधान बदलासाठीच दिला होता. त्यामुळे येत्या दोन वर्षात हे सरकार स्वतःच्याच वजनाने पडेल, असा दावाही यादव यांनी केला.
दरम्यान, ओबीसी विभागाने विधानसभेच्या २७ जागा प्रदेश काँग्रेसकडे मागितल्या आहेत व त्यात नगरची जागा महिला म्हणून मंगलताई भुजबळ यांना द्यावी असे पदाधिकाऱ्यांनी सुचवल्याचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी यावेळी सांगितले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय अध्यक्ष यादव यांनी, ज्या उमेदवाराचे प्रत्येक बुथवर किमान १० सदस्य असतील व बूथ स्तरावर संपर्क यंत्रणा आहे, अशांना पसंती दिली जाणार आहे. काँग्रेसचा निधी सिझ (जप्त) झाला असल्याने ज्या उमेदवाराकडे निधी आहे त्यालाही पसंती असेल. यासंदर्भात निरीक्षक तिरूमला (केरळ) प्रत्येक मतदारसंघात दौरे करणार आहे, असे त्यांनी आवर्जून सांगून अहमदनगर शहरात मंगल भुजबळ यांना चांगले वातावरण असून त्यांच्यासाठी आम्ही वरिष्ठ लेवलवरून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले..
दोघांची तक्रार करणार
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या ओबीसी विभागाची नगरमध्ये बैठक असताना व राष्ट्रीय अध्यक्ष आले असताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे या बैठकीकडे फिरकले नाही, याबाबत विचारले असता, यासंदर्भात ओबीसींचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार करतील, असे राष्ट्रीय अध्यक्ष यादव यांनी स्पष्ट केले. मात्र, जिल्हाध्यक्ष वाघ काही काळ बैठकीला आले होते व नंतर निघून गेले, असे ओबीसी राष्ट्रीय समन्वयक मंगल भुजबळ यांनी सांगितले.