थोरल्या, धाकट्या पवारांचे निकटवर्तीय सुजित झावरेंसमोर पर्याय कोणता? ‘तुतारी’, ‘घड्याळ’ की ‘कमळ’
नगर (सचिन कलमदाणे) : नगर जिल्ह्यातील पारनेर-नगर विधानसभा निवडणुकीची चर्चा जोरात सुरु झाली असून महाविकास आघाडी व महायुतीमध्ये या मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे निलेश लंके खासदार झालेत. त्यामुळे मविआमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादीच या मतदारसंघात उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटानेही उचल खाल्ली असून पक्षाने नुकताच पारनेरमध्ये मेळावा घेवून या जागेवर दावा केला आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये अजित पवार गटाचा या मतदारसंघावर दावा कायम आहे. भाजपचे काही पदाधिकारी इच्छुक असले तरी महायुतीचे जागावाटप वरिष्ठ स्तरावर होणार असल्याने इच्छुकांना ऐनवेळी फक्त मित्र पक्षाचाच प्रचार करावा लागू शकतो.
पारेनर-नगर विधानसभा मतदारसंघातील या राजकारणात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांची भूमिका अद्याप गुलदस्त्यात आहे. 2014 ला सुजित झावरे यांनी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव पत्कारावा लागला. नंतरच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणे बदलली. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ राहिलेली नाही. बदलत्या राजकीय परिस्थितीत सुजित झावरे यांनीही कमळ हाती घेतले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासाठी मन लावून काम केले. भाजपला पारनेरमध्ये अपेक्षित यश मिळाले नसले तरी सुजित झावरे यांना मानणारा मोठा समर्थक वर्ग मतदारसंघात आहे.
या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्यापासून सुजित झावरे यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा सुरु झाली आहे. त्यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही निकटचे व जवळचे संबंध आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुजित झावरे यांना ‘तुतारी’ तसेच ‘घड्याळा’चीही ऑफर आली आहे. झावरे यांची राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या वरिष्ठांशी प्राथमिक बोलणी झाल्याचीही माहिती आहे. अर्थात झावरे यांनी या माहितीस दुजोरा देण्यास नकार दिला असला तरी पडद्यामागे खूप घडामोडी घडत आहेत हे नक्की आहे. भाजपने पारनेरची जागा मिळवल्यास झावरे यांच्यासमोर कमळाचाही पर्याय खुला राहू शकतो. लोकसभा निवडणुक प्रचार काळात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही झावरेंचे कौतुक करीत विधानसभेचे संकेत दिले होते. त्यामुळेच सुजित झावरे सध्या वेट ॲण्ड वॉचवर असून निवडक समर्थकांसमवेत रणनिती आखत आहेत.