पारनेर-भोयरे गांगर्डा येथील रसाळवाडी येथे एकाच रात्रीत तीन घरे फोडल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. यावेळी एका वृध्देस जबर मारहाण करण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने याचा तातडीने शोध घेऊन चोरांना अटक करावी व गस्त घालावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान भोयरे गांगर्डा येथील रसाळवाडी येथे चोरट्यांचा थरार सुरू होता. यावेळी चोरट्यांनी एका वृद्ध महिलेस जबर मारहाण केली. सारोळा रस्त्यालगत रहिवासी असलेल्या शोभा चंद्रकांत रसाळ ही महिला एकटी असल्याचे पाहून चार ते पाच चोरट्यांनी कटावणीच्या सहायाने घराचा दरवाजा उघडला व आत प्रवेश केला.
यावेळी महिलेचे अंगावरील, कपाटातील दोन तोळे सोने व रोख रक्कम असा दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी बळजबरीने हिसकावून घेतला. महिलेने त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्या महिलेला लोखंडी गज व पाईपच्या सहायाने जबर मारहाण केली. या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाली आहे. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा रसाळवाडी येथे वळवला. रसाळवाडी येथील सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश रसाळ हे दोघे पती-पत्नी घरात झोपले असताना सुमारे दोन ते तीन चोरट्यांनी कटावणीच्या सहायाने घराचा दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याचा आवाज आल्यानंतर रसाळ जागे झाले. यावेळी पत्नी विमल यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजारी राहणारे त्यांचे पुतणे राजेंद्र रसाळ उठल्यानंतर कटावणी जागेवरच सोडून चोरट्यांनी तेथून पळ काढला.
यावेळी ग्रामस्थ जागे झाल्यानंतर चोरट्यांनी वस्तीवरीलच मंदाबाई मल्हारराव रसाळ यांच्या घरावर हल्ला केला. हे घर लावलेले असल्यामुळे तेथील दरवाजा देखील कटावणीच्या सहायाने उघडला व घरातील किराणा सामानाची उचकापाचक केली व कपाट उघडून त्यातील नवीन साड्या एक लोखंडी पेटी यासह रोख रक्कम असा एक लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. दरोडेखोर अतिशय सराईत असून घरफोडी करताना धाक दाखवण्यासाठी व चोरी करण्यासाठी धारदार शस्त्रे कमरेला तलवार, सळई, कोयते, कटावणी असे वेगवेगळे हत्यारे वापरून चोरी करत आहेत. याठिकाणी राहणार्या एकाकी घरावर पाळत ठेवून दरोडा टाकत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. अशा प्रकारच्या चोरीच्या पाच ते सहा घटना घडून देखील सुपा पोलिसांना अद्याप दरोडेखोरांचा शोध लागलेला नाही.
त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षकांनी यात लक्ष घालून सुपा पोलीस स्टेशन हद्दीमधील वाढत्या दरोड्यांवर आवर घालावा व दरोडेखोरांचा शोध लावण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून स्वतःच्या शेताकडे जाण्यास शेतकर्यांनाही भीती वाटत आहे. या घडलेल्या घटनेचा शोध घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांपुढे असून गुन्हेगारांना व दरोडेखोरांना जेरबंद करण्याची मागणी भोयरे गांगर्डातील नागरिकांकडून केली जात आहे.