घराच्या जागेवरुन झालेल्या वादात माय-लेकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहमदनगरच्या पारनेर शहरातील कुंभार गल्लीमध्ये हा प्रकार घडला आहे. आरोपींविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलिसांकडून सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या जागेवरून पारनेर परिसरात राहणाऱ्या श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबियांमध्ये वाद सुरु होते. यावरुन दोन्ही कुटुंबियांमध्ये नेहमीच खटके उडत असत. मात्र गुरुवारी या वादाने टोक गाठलं आणि दोन जणांचा जीव यामध्ये गेला आहे.गुरुवारी संध्याकाळी किरण श्रीमंदिलकर आणि येणारे कुटुंबात पुन्हा वाद झाला. यावेळी किरण याने शितल येणारे आणि अडीच वर्षांचा स्वराज येणारे यांच्या अंगावर गाडी घातली. यामध्ये शितल आणि स्वराज यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
याप्रकरणी मृत महिलेची सासू चंद्रकला येणारे यांच्या फिर्यादीवरून किरण श्रीमंदिलकर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.