पारनेर येथे महायुतीचा बैठक मेळावा पार पडला. या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका स्पष्ट केली. पारनेरात वेगळा पायंडा पडत असून,
तालुक्याची राजकीय संस्कृती बिघडली असल्याचे व त्यास बिघडवणारे लोकप्रतिनिधी जबाबदार असल्याचा घणाघात यावेळी माजी सभापती काशिनाथ दाते सर यांनी केला.
तसेच ते पुढे म्हणाले, पुढील काळात तालुक्यात काम करत असताना सर्वांनी आक्रमक भूमिका घेऊन काम करणे गरजेचे आहे. शंकरराव काळेंपासून माजी आमदार वसंतराव झावरे, विजयराव औटी, नंदकुमार झावरे, बाबासाहेब ठुबे यांच्या काळातील वैचारिक बैठक आता तालुक्यात राहिली नाही,ती बिघडवण्याचे काम सुरू आहे. सहकार संपवण्याचे काम सुरू आहे. तालुका वाचला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ज्येष्ठ नेते माजी सभापती काशिनाथ दाते सर यांनी पारनेर येथे झालेल्या महायुतीच्या बैठक मेळाव्यात मत व्यक्त केले.पुढे बोलताना दाते म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन महायुतीच्या उमेदवार निवडून आणण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करणे गरजेचे आहे.
पारनेर येथे झालेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये माजी खासदार सुजय विखे यांचा लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर, या ठिकाणी विचारमंथन करण्यात आले व येणाऱ्या विधानसभा व निवडणुकांमध्ये पक्ष संघटनेमध्ये व महायुतीमध्ये कशा पद्धतीने संघटनात्मक नियोजन करून निवडणुका जिंकणे सोपे होईल, यावर चर्चा करण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे,जेष्ठ नेते काशिनाथ दाते सर, जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, माजी सभापती गणेश शेळके, शिवसेना (शिंदे गट) तालुकाध्यक्ष नील बंडू रोहकले, भाजप नेते सुनील थोरात,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात आदीसह राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी वकार्यकर्ते उपस्थित होते.