सध्या शरद पवार गटाची धुरा वाहणारे आमदार रोहित पवार यांनी आमदार नीलेश लंके यांच्या पारनेरमध्ये महिलांसाठी भाऊबीजेच्या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे या कार्यक्रमानिमित्त तालुक्यातील महिलांना एकत्र करण्याचे काम पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी अर्थात आ.निलेश लंके यांचे सध्याचे कट्टर राजकीय वैरी यांकडे होते. त्यामुळं सर्वांनीच तोंडात बोटे घातली. त्यानंतर त्यांनी भेट घेतली सुजित झावरे यांची. तेथे जात त्यांनी दिवाळी फराळ घेतले.
लंके यांना शह देण्यासाठी खेळी
अजित पवार हे राष्ट्रवादीत बंड करून भाजप सोबत गेले. आमदार नीलेश लंके हे देखील शरद पवार गटाची साथ सोडत अजित दादांसोबत गेले. आ.लंके यांची लोकप्रियता पाहता मोठ्या पवार साहेबांनी किंवा आ. रोहित पवार यांनीही त्यांना थेट विरोध केला नाही. पण आता विजय औटी यांना सोबत घेत व सुजित झावरे यांची भेट घेत लंके यांना शह देण्यासाठी आ. रोहित पवार यांनी खेळी सुरू केली असल्याची चर्चा आहे.