अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये झालेल्या गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे 16 कोटी 76 लाख 85 हजार 368 रूपयांचे अनुदान मंजुर झाल्याची माहीती आ. नीलेश लंके यांनी दिली. 26 व 27 नोहेंबर रोजी पारनेर तालुक्याच्या विविध भागामध्ये ही गारपीट झाली होती. गारपीटग्रस्त शेतक-यांना तातडीने अनुदान देण्यासाठी आ. लंके यांनी नागपुर हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीद्वारे सरकारचे लक्ष वेधले होते. आ. लंके यांच्या या लक्षवेधीची सरकारने दखल घेत हे अनुदान मंजुर केले आहे. नोहेंबर महिन्यात दोन दिवस झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतांमधील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. रविवार दि. 26 नोहेंबर रोजी गारपीट झाल्यानंतर आ. लंके यांनी सोमवारी सकाळीच मोठया प्रमाणावर गारपीट झालेल्या पानोली, वडूले, सांगवी सुर्या, गांजीभोयरे या गावांना भेटी देत शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. नुकसानीची पाहणी केल्यानंतर आ. लंके यांनी तात्काळ जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्याशी चर्चा करून नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या होत्या. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही संपर्क करून लंके यांनी गारपीटीने झालेल्या नुकसानीबाबत अवगत केले होते.
- Advertisement -