अॅड. राहुल झावरे यांच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला पारनेरचा मा. नगराध्यक्ष विजय औटी याच्यासह इतर दोघांची जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावले. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे विजय औटी, प्रितेश पानमंद व मंगेश कावरे यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. दरम्यान, सिव्हील रूग्णालयात उपचाराच्या नावाखाली दखल केलेल्या विजय औटी याच्या शाही बडदास्तीचाही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पर्दाफाश केल्याने औटी याच्या अडचणींमध्ये अधिक वाढ झाली आहे.
विजय औटी, प्रितेश पानमंद तसेच मंगेश कावरे यांचे जामीन अर्ज नगरच्या न्यायालयाने फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात तिघांच्या वतीने जमीन अर्ज दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्यावर सुनावणी झाली. आरोपींच्या वकीलांनी जामीन अर्ज मांडल्यानंतर फिर्यादीचे वकील राहुल करपे यांनी त्यास आक्षेप घेतला. अॅड. करपे यांनी पोलीसांनी सादर केलेला व्हिडीओ जप्त पंचनामा वाचून दाखविला. ही घटना आंबेडकर चौकात घडली असून व्हिडीओ क्रॉप करून सादर करण्यात आल्याचे ते म्हणाले. फलॅट तसेच शॉपची बनावट दस्तऐवज तयार करून नगरपंचायत दप्तरी नोंद केल्याप्रकरणी दाखल गुन्हा, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण तसेच लोकसभा निवडणूकीपूर्वी दाखल झालेल्या गुन्हयाचा संदर्भ देत अॅड. करपे यांनी औटी याची पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. औषधोपचाराच्या नावाखाली रूग्णालयात दाखल होउन मला औषधोपचाराची गरज नाही हे आरोपी औटी याने स्वतः लिहून दिले आहे. यावरून हा आरोपी अहंकारी असून प्रशासनास त्रास देणे, दडपशाही करण्याचा तो प्रयत्न करत असल्याचे अॅड. करपे यांनी सांगितले. त्यानंतर औटी याच्या वकीलांनी जामीन अर्ज मागे घेतला व न्यायालयाने जामीन फेटाळून लावला.
दरम्यान, पोटदुखीचे कारण करून शुक्रवार दि.२ ऑगस्ट रोजी आगोदर पारनेरचे ग्रामीण रूग्णालय व तेथून नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या विजय औटी याची हॉस्पिटलध्ये शाही बडदास्त ठेवली जात असल्याचा पर्दाफाश महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री केला. काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पोटे व कार्यकर्त्यांनी रूग्णालयात ठिय्या आंदोलन केल्यानंतर रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी औटी यास तेथून पारनेर येथे हालविण्यात आले असे काळे यांनी सांगितले.
आंदोलनानंतर आरोपीस गायब केले
आरोपीला शाही वागणूक दिली जात असल्याची माहीती मिळाल्यानंतर आम्ही सिव्हील हॉस्पिटलमध्ये ठिय्या दिल्यानंतर आरोपी औटी यास रूग्णालयातून गायब करण्यात आल्याचा आरोप आंदोलक किरण काळे यांनी केला. पुण्यातील ललीत पाटील प्रकरणाची पुनरावृत्ती नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये झाली आहे. भाजपाचा कार्यकर्ता असलेला औटी हा कुणाचा कार्यकर्ता आहे हे जिल्हयातील जनतेला माहीती आहे. रूग्णालयातून त्याला सकाळीच डिस्जार्ज दिल्याचे सध्या नियुक्तीस असलेले डॉक्टर सांगतात असेही काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
आम्ही औटी यास सकाळीच सोडले होते. परंतू तो रूग्णालयातून गेला नाही. रूग्णालयात जाऊन पाहणी केली असता त्याची पोटाची तक्रार असल्याचे कागदोपत्री नोंद होती. त्याला आरोपींच्या वॉर्डात न ठेवता आर्थो विभागात भरती करण्यात आले होते. आपण कुठल्याही प्रकारची औषधे घेणार नाही असे औटी याने लिहून दिले आहे.
डॉ. संजय घोगरे
जिल्हा शल्य चिकित्सक
आरोपी औटी हा फोनवर बोलतानाचा व्हिडीओ तसेच छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. त्याला रूग्णालयातून व्हिआयपी वागणूक पुरविण्यात आली. काहीही आजार नसतना त्याला रूग्णालयात भरती करण्यात आले. आंदोलनासाठी आम्ही आल्याचे समजताच औटी यास रूग्णालयातून पळविण्यात आले. त्याला मदत करणारांची चौकशी झाली पाहिजे. रूग्णालय प्रशासनाने सीसीटीव्ही फुुटेज उपलब्ध करून द्यावे.
किरण काळे
शहराध्यक्ष, काँग्रेस