भाजपातील पिचड पिता पुत्र जोडीने शरद पवारांची त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतल्याचं समोर आले आहे. मधुकर पिचड आणि वैभव पिचड हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महायुतीत अकोले विधानसभा मतदारसंघाची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जात असल्याने पिचड कुटुंबीय वेगळा पर्याय शोधण्याच्या मार्गावर आहेत. मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांची भेट घेत जवळपास अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीमुळे लवकरच हे दोन्ही नेते पुन्हा घरवापसी करतील असं बोललं जाते. मधुकर पिचड हे आधी राष्ट्रवादीत होते, त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळली आहे मात्र २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता.
महाविकास आघाडीच्या जागावाटपात अकोले मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. त्यामुळे पिचडांना त्याठिकाणाहून उमेदवारीची संधी आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे किरण लहामट हे आमदार आहेत.