अहमदनगर दक्षिण लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेकडून करण्यात आली आहे. संघटनेने निवडणूक आयोग आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे. निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर एका भाषणात बोलताना निलेश लंके यांनी पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. कार्यकर्त्यांवरती कारवाई झाल्यानंतर निलेश लंके यांनी भाषणादरम्यान “इथे पोलीस विभागातील कोणी असेल तर संबंधित पीआयला सांगा तुमचा बाप दहा मिनिटात तिथे येतोय” असं विधान केलं होतं. निलेश लंकेंच्या या विधानावरुन आता महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून पोलिसांचा बाप काढणाऱ्या निलेश लंके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, निलेश लंके यांच्या वक्तव्याचा पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे.