अहमदनगर- उपवर झालेल्या मुलाचे लग्न करण्यासाठी मुलगी दाखवितो असे सांगून पैसे घेणारी आणि मुलीचे अगोदर लग्न झालेले असतानाही दुसरे लग्न लावून देवून नंतर घरातील रोकड व दागिने घेवून पसार होत फसवणूक करणाऱ्या ८ जणांच्या टोळीतील चौघांना लोणी (ता.राहता) पोलिसांनी पकडले आहे. त्यात ३ महिलांसह एका व्यक्तीचा समावेश आहे.
याबाबत भगवतीपुर (ता. राहता) येथे आरोपी महीला रेश्मा उर्फ दिव्या रमेश चव्हाण, रोहिणी कैलास गायकवाड, दिपीका प्रविण कांबळे (सर्व रा. बदलापुर, बेलवली ता. अमरनाथ जि.ठाणे), पुंडलिक चांगदेव शिंदे उर्फ सतिष बाबासाहेब शिंदे (रा. तिळवणी ता. कोपरगाव), अनिता संतोष चंदनशिवे, संतोष फकिरा चंदनशिवे, राममल राठोड, संगिता घुले (सर्व रा. छत्रपती संभाजीनगर) यांनी संगणमत करुन यातील फिर्यादीचा मुलगा मयुर दशरथ गायकवाड यांचे लग्न करण्यासाठी मुलगी दाखवितो असे सांगितले.
त्यानंतर मध्यस्थ आरोपी पुंडलीक चांगदेव शिंदे उर्फ सतिश बाबासाहेब शिंदे यांनी आरोपी दिपीका प्रविण कांबळे हीचे लग्न झालेले असतांना ती नवरी आहे असे भासवुन फिर्यादी दशरथ शंकर गायकवाड यांचे कडुन लग्न लावण्यासाठी ३ लाख २० हजार रुपये घेतले व तिचे त्यांचे मुलांशी लग्न लावून देवुन त्यांची फसवणुक केली होती. या बाबत लोणी पोलीस ठाण्यात भा.दं. वि.कलम 420, ४१८, ४०६, ४१७, १२० (ब), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्हयाचा तपास करताना स.पो.नि. युवराज आठरे, उपनिरीक्षक योगेश शिंदे, उपनिरीक्षक आशिष चौधरी, पो.हे.कॉ. दिनकर चव्हाण, पो.ना. रविंद मेढे, गणेश आंडागळे, पो.कॉ. मच्छिद्र इंगळे, महिला पो.कॉ. जयश्री सातपुते, मनिषा गिरी यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहिती वरून या टोळीतील आरोपी पुडलीक चांगदेव शिंदे उर्फ सतिश बाबासाहेब शिंदे, रेश्मा उर्फ दिव्या रमेश चव्हाण, रोहिणी कैलास गायकवाड, दिपीका प्रविण कांबळे यांना जेरबंद केले आहे. या टोळीवर लोणी (ता.राहाता), विरगाव (ता. पैठण), रमजानपुरा (ता. मालेगाव) या पोलिस ठाण्यांमध्ये अशाच प्रकारे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.